टी20 वर्ल्ड कपमध्ये आज हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियात लढत होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. हिंदुस्थानने आधीच सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. मात्र हिंदुस्थानच्या तगड्या आव्हानाचा सामना करीत ऑस्ट्रेलियाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. अशात हिंदुस्थानला टक्कर देण्याआधी ऑस्ट्रेलियाला वरुणराजा पावणार का? याकडेही क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.
हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 वर्ल्ड कपचा आज सुपर-8 राऊंड आहे. ग्रॉस आयलेटमधील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरु होईल. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा जोरदार सामना रंगणार आहे. हिंदुस्थानच्या संघाने जवळपास सेमी फायनलमध्ये आपले स्थान पक्के केल्याने हिंदुस्थानमधील क्रिकेट प्रेमींना रात्री होणाऱ्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. मात्र, ग्रॉस आयलेटमध्ये आज वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने क्रिकेट प्रेमी नाराज होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर असाच सुरुच राहिला तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
सामना रद्द झाल्यास हिंदुस्थानच्या संघाला फायदा
सुपर-8 सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नसल्याने पावसामुळे सामना रद्द झाल्यास हिंदुस्थानच्या संघाला याचा फायदा होणार आहे. कोणत्याही कारणाने सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 पॉईंट देण्यात येईल. यामुळे हिंदुस्थानचा संघ 5 पॉईंट्ससह ग्रुप-1 मध्ये टॉपवर राहत सेमी फायनलमध्ये पोहचेल.
ऑस्ट्रेलियासमोर समोर मोठे आव्हान
सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानचे स्थान पक्के आहेच, मात्र सामना रद्द झाल्यास कांगारुंसमोर अवघड परिस्थिती निर्माण होईल. सामना रद्द झाल्यास मिळालेल्या एका पॉईंटनंतर ऑस्ट्रेलियाकडे एकूण 3 पॉईंट्स होतील. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला अफगानिस्तान Vs बांग्लादेश सामन्यावर अवलंबून रहावे लागेल. अफगानिस्तानचा संघ सामना जिंकला, तर 4 पॉईंट्ससह सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो आणि ऑस्ट्रेलियाचा टी-20 मधून पत्ता कट होईल. मात्र बांग्लादेश जर सामना जिंकला, तर दोन्ही संघ टी-20 मधून बाद होतील आणि ऑस्ट्रेलियाला 3 पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये संधी मिळेल.
टी20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियाचा संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिंस, टिम डेविड, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर आणि एडम जाम्पा.