हिंदुस्थानच्या 84 खेळाडूंच्या पॅरालिम्पिक पथकांना अपेक्षित पदकविक्रम रचला. सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक पथकापेक्षा सरस कामगिरी करताना पॅरालिम्पिक पथकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या 19 पदकांना मागे टाकत नव्या विक्रमाची नोंद केली. पदकांच्या रौप्य महोत्सवाकडे झेपावलेल्या हिंदुस्थानी पथकाने सातव्या दिवशी 4 सुवर्णांसह 22 पदके जिंकली आहेत.
हिंदुस्थानची सर्वोत्तम कामगिरी
हिंदुस्थानचे पॅरालिम्पिक खेळाडू आपल्या टोकियोच्या कामगिरीला मागे टाकणार, हे निश्चित होते आणि त्यांनी स्पर्धेच्या सहाव्या दिवशीच हा पराक्रम केला. मंगळवारी उशिरा झालेल्या उंच उडीच्या टी 63 श्रेणीत शरद कुमारने रौप्य पदक जिंकले. अमेरिकेच्या इझरा फ्रेचने 1.91 मीटर उंच उडी मारत आघाडी घेतली होती. शरदला सोने जिंकण्यासाठी 1.94 मीटर उंच उडी मारायची होती, पण तो 1.88 मीटर उंच उडी मारू शकला आणि त्याचे सोनेरी स्वप्न भंगले. मरिअप्पन थंगवेलूने 1.85 मीटर उंच उडी मारत कांस्य जिंकले.
विशेष म्हणजे फ्रेचच्या 1.94 मीटर उडीला मागे टाकण्याची संधी हिंदुस्थानच्या तिन्ही अॅथलीटना मिळाली, पण कुणीही ती उंची गाठू शकला नाही. हिंदुस्थानचा शैलेश कुमार चौथा आला. या गटात दोन पदके जिंकल्यामुळे हिंदुस्थानने आपल्या टोकियोतील 19 पदकांचा विक्रम मोडीत काढला. रिओ द जनेरो पॅरालिम्पिकपासून हिंदुस्थानच्या कामगिरीत पदकांची वाढच होत आहे.
2016 च्या स्पर्धेत हिंदुस्थानने सर्वाधिक चार पदके जिंकली होती (ऑलिम्पिक पथकाला फक्त दोन पदके) तर 2020 मध्ये त्या पदकांना मागे टाकत 19 पदकांचा (ऑलिम्पिक पथकाला फक्त 7 पदके) नवा विक्रम प्रस्थापित केला होता. आता हिंदुस्थानने 22 पदके (ऑलिम्पिक पथकाला 6 पदके) जिंकली असली तरी सर्वाधिक 5 सुवर्ण टोकियोत जिंकली आहेत.
खिलारीचे सुवर्ण 4 सेंमीनी हुकले
गेल्या 40 वर्षांत हिंदुस्थानने प्रथमच गोळाफेकीचे पदक जिंकण्याचा पराक्रम केला. गोळाफेकीच्या एफ 46 श्रेणीच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या सचिन खिलारी, यासर मोहम्मद आणि रोहित कुमारने धडक मारली होती. या फेरीत गोळाफेक पाहता महाराष्ट्राच्या सचिन खिलारीचाच दम दिसत होता. त्याने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात 16.32 मीटर गोळाफेक करत सुवर्ण पदकावर दावा केला होता. त्यानंतर तो चौथ्या फेरीपर्यंत आघाडीवर होता. विशेष म्हणजे त्याने सहाही प्रयत्नांत यशस्वी गोळाफेक केलीच, पण प्रत्येक फेकही 16 मीटर आणि त्यापेक्षा अधिकचीच होती. मात्र पाचव्या प्रयत्नात कॅनडाच्या ग्रेग स्टुअर्टने सचिनपेक्षा 4 सेंमी जास्त गोळाफेक केली आणि आघाडी घेतली जी शेवटपर्यंत कायम राखली. सचिनला आपल्या शेवटच्या प्रयत्नात 4 सेंमीच्या पिछाडीला मागे टाकण्यात अपयश आले.
भालाफेकीत हिंदुस्थानचाच दबदबा
भालाफेकीच्या एफ 64 श्रेणीत सुमित अंतिलने आपला सुवर्ण राखण्याचा पराक्रम केलाच होता. आज भालाफेकीच्याच एफ 46 श्रेणीत अंतिम फेरीत हिंदुस्थानचे एक नव्हे तर तीन अॅथलीट होते. या पदकाच्या भालाफेकीत सुंदरसिंग गुर्जरच्या नावावर विश्वविक्रम होता. त्यामुळे त्याच्याकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा होती, पण तो कांस्य पदक जिंकू शकला आणि अजित सिंगने आपल्या पाचव्या प्रयत्नात 65.62 मीटर ही फेक करत रौप्य पदक काबीज केले. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोंझालेझ वेरोनाने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात 66.14 मीटरची फेक करत आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राखली. याच फेरीत हिंदुस्थानच्याच रिंकूने पाचवे स्थान मिळवले.
हरविंदरचा सुवर्णावर निशाणा, तिरंदाजीत हिंदुस्थानने प्रथमच जिंकले सुवर्ण
हिंदुस्थानच्या हरविंदर सिंगने अत्यंत अटीतटीच्या उपांत्य लढतीत बाजी मारत अंतिम फेरी गाठली. मात्र सुवर्ण पदकाच्या लढतीत पोलंडच्या लुकास सिसझेकचा सलग तीन सेटमध्ये 28-24, 28-27, 29-25 असा धुव्वा उडवला आणि हिंदुस्थानला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक खुल्या रिकर्व्ह गटात यश मिळवत चौथे सुवर्ण जिंकून दिले. एवढेच नव्हे तर पॅरालिम्पिकच्या इतिहासात हिंदुस्थानी तिरंदाजाला प्रथमच सुवर्ण जिंकण्यात यश लाभले आहे.
हरविंदर सिंगने आज उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे सामने जबरदस्त जिंकत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याने चिनी तैपेईच्या खेळाडूचा 7-3 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली तर पुढच्या फेरीत इंडोनेशियन सेतियावानला 6-2 असे सहज नमवले. उपांत्य सामना कमालीचा रंगला. या लढतीत इराणच्या मोहम्मद रेझा अरब अमेरीने 26-25 असा पहिला सेट जिंकत दमदार सुरुवात केली. त्यानंतर हरविंदरने दुसरा सेट 27-27 असा बरोबरीत सोडवला. त्यामुळे हरविंदर 1-3 ने पिछाडीवर होता. पण पुढील तिन्ही सेट 27-25, 26-24 आणि 26-25 असे जिंकत हरविंदरने अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला होता. सुवर्ण पदकाच्या लढतीत पोलंडच्या लुकास भ्रमनिरास केला. ही लढत हरविंदरने पहिल्या तीन सेटमध्येच आपल्या खिशात घातली आणि हिंदुस्थानला चौथे सुवर्ण जिंकून दिले.