रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद

‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला यूटय़ूबर रणवीर अलाहाबादिया आता अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा पह्न सातत्याने बंद येत आहे. याशिवाय, गुरुवारी सायंकाळी मुंबई पोलीस रणवीरच्या घरी गेले असता त्याच्या घराला कुलूप होते.

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये जज म्हणून आलेल्या रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे रणवीरसोबत शोचा होस्ट समय रैना, अपूर्व मखिजा, आशिष चंचलानी आणि शोची टीम कायद्याच्या कचाटय़ात अडकली आहे. प्रत्येकाची खार पोलीस ठाण्यात चौकशी केली जात आहे. रणवीर अलाहाबादिया यालाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते, पण तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाला नाही. पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही तो चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या वर्सोवा येथील घरी गेले. तिथे त्याच्या घराला कुलूप होते, त्याचा फोन देखील सातत्याने बंद लागतोय. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.