
>> प्रभाकर पवार
समय रैना (27) या काश्मिरी पंडिताच्या दिवट्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ नावाच्या स्टँडअप कॉमेडी या कार्यक्रमात (शिव्या व अश्लीलता असलेल्या) ‘द रणवीर शो’ या पॉडकास्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केलेल्या रणवीर अलाहाबादिया (32) या यूट्यूबरने मुंबईतील खार येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अश्लीलतेची हद्द गाठली. त्याने एका स्त्री स्पर्धकाला आई-वडिलांच्या सेक्सबद्दल प्रश्न विचारून आपल्यातील विकृती साऱ्या जगासमोर आणली. हा व्हिडीओ जेव्हा वायरल झाला, तेव्हा साऱ्या देशात संताप व्यक्त करण्यात आला. रणवीरचे फोटो जाळण्यात आले. मुंबईसह देशभरात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्र सायबर सेलने या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या व त्यात भाग घेणाऱ्या 50 च्या वर तरुण-तरुणींवर गुन्हे दाखल केले तेव्हा रणवीरने अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. सूर्यकांत व न्या. कोटिश्वर सिंह म्हणाले, “तुम्ही जे आई-वडिलांविषयी शब्द वापरले आहेत, त्याने सारा समाज ओशाळला आहे. सर्वांना लाज वाटत आहे. तुम्ही तुमची विकृतीच समाजासमोर आणली आहे.” असे मत व्यक्त करून या खंडपीठाने रणवीरच्या अटकेला स्थगिती दिली व विदेशात पळून जाण्यास बंदी घातली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या दीड दशकापासून स्टँडअप कॉमेडी शोमध्ये रणवीर अलाहाबादियासारख्या विकृतांनी धुमाकूळ घातला आहे. आपली पु. ल. देशपांडेंसारख्या विनोदवीरांची परंपरा आहे. पुलंच्या हेल्दी स्टँडअप कॉमेडीचा आनंद आजही घेतला जातो, परंतु इंटरनेटबरोबर जन्माला आलेल्या समय रैना, रणवीर अलाहाबादियासारख्या नवीन पिढीने डार्क जोक्सच्या नावाखाली आपल्या संस्कृतीवरच घाला घातला आहे. नर आणि मादी या दोन पात्रांशिवाय त्यांच्या डोक्यात काहीच येत नाही समाजात ‘गंदगी’ पसरविणाऱ्या या अश्लील टोळ्या आहेत.
स्टँडअप कॉमेडीमध्ये अश्लील शेरेबाजी करणाऱ्या करण जोहर या चित्रपट निर्माता व दिग्दर्शकासह 14 जणांवर 2015 साली मुंबईच्या ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्टँडअप कॉमेडी शो सादर करणाऱ्या आयोजकांवर मुंबईत असा पहिलाच गुन्हा दाखल झाला होता. सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोन, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आदी कलाकारांनी करण जोहरच्या एआयबी नॉक आऊट’ या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यात अश्लील शेरेबाजी करण्यात आली होती. पुरुष व स्त्रियांच्या लिंगावर या कार्यक्रमात चर्चा रंगली असताना सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराच्या अभिनेत्री मुलीचा टाळ्या वाजवताना व कॉमेडियनला प्रोत्साहन देतानाचा फोटो वायरल झाला होता. तेव्हा अश्लीलतेचे महिलाच समर्थन करताना प्रत्येक स्टँडअप कॉमेडी शोमध्ये दिसून येते. समय रैनाच्या कार्यक्रमात अपूर्वा मखिजा या ‘होस्ट’ तरुणीची अश्लील भाषा तर थक्क करणारी होती. हे जर थांबले नाही तर, अशा कार्यक्रमांवर जोपर्यंत निर्बंध येणार नाहीत, तोपर्यंत हिंदुस्थानी संस्कृतीवर असे प्रहार होतच राहतील.
स्टँडअप कॉमेडीची पाश्चिमात्य संस्कृती आपल्या देशात राबविली जात आहे. त्यासाठी नवनवीन यूट्यूबर तयार होत आहेत. रणवीर अलाहाबादियासारखी धीरूभाई अंबानीसारख्या इंटरनॅशनल शाळा, कॉलेजात शिकलेली पोरं या पॉडकास्ट व्यवसायात येऊन काही कोटींचे मालकही झाले आहेत, परंतु हेच व्यावसायिक लोक तरुण पिढीला बिघडविण्याचे, बरबाद करण्याचे काम करीत आहेत. समाजात द्वेष, क्लेष, अश्लीलता पसरविणाऱ्यांविरुद्ध आपल्या देशात हवी तशी कारवाई होत नाही. केवळ गुन्हे दाखल केले जातात. राजकीय दबावानंतर अटक न करता कोर्टात केवळ आरोपपत्र दाखल केले जाते. त्यामुळेच समाजात अश्लीलता पसरविणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही.
सोशल मीडियाद्वारे आज वाईट गोष्टी अधिक प्रमाणात पसरविल्या जात असल्यामुळे साऱ्या समाजाचे स्वास्थ्य बिघडले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोण कुठेही कसाही बरळत आहे, व्यक्त होत आहे. चॅनेलसमोर, बूमसमोर येऊन कुणीही कुणालाही शिवीगाळ करतो, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करतो. हे थांबले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे असेच सुरू राहिले तर उद्या आपला देश व संस्कृतीही टिकणार नाही. इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आदी सोशल मीडिया मानवजातीच्या संस्कृतीच्या मुळावर आली आहे. त्यामुळे भविष्यात या समाजाचे काय होणार? असा प्रश्न आहे सारेच चिंतनीय आहे.