
हिंदुस्थानच्या डीआरडीओने महत्त्वपूर्ण शस्त्र विकसित केले आहे. या शस्त्राने शत्रूचे ड्रोन, विमाने, क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करता येतील. त्यामुळे देशाची संरक्षण क्षमता वाढली आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान असलेला हिंदुस्थान हा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा चौथा देश ठरला आहे. या नव्या शस्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच डीआरडीओने घेतली. डीआरडीओच्या नव्या लेसर आधारित शस्त्र प्रणालीचा वापर करून फिक्स्ड विंग असलेली विमाने, क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करता येतील. त्यामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा गाठता येणार आहे. आज तुम्ही जे पाहिले ते स्टार वॉर्स तंत्रज्ञानातील घटकांपैकी एक होते, असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी सांगितले. डीआरडीओ प्रयोगशाळा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी साधलेला समन्वय साधून हे शस्त्र तयार केले आहे. ही तर प्रवासाची सुरुवात आहे. मला खात्री आहे की, आपण लवकरच ध्येय गाठू. आता आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स यासारख्या इतर उच्च ऊर्जा प्रणालीवर देखील काम करत आहोत. स्टार्स वॉर क्षमता विकसित होईल अशा अनेक तंत्रज्ञानावर काम करत आहोत, असे डॉ. कामत म्हणाले.
लेसर प्रणाली कशी काम करेल
ही लेसर प्रणाली डीआरडीओच्या उच्च- ऊर्जा प्रणाली केंद्राने विकसित केली आहे. एलआरडीई, आयआरडीई, डीएलआरएल आणि देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचाही यात सहभाग होता. या प्रणालीने संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये कामगिरी केली. डीईडब्ल्यूने ड्रोन पाडले, पाळत ठेवणारे अँटेना जाळून टाकले आणि शत्रूचे सेन्सर जाम केले. जेव्हा रडार किंवा त्याच्या अंगभूत इलेक्ट्रो-ऑप्टिक प्रणालीद्वारे लक्ष्य शोधले जाते, तेव्हा डीईडब्ल्यू प्रकाशाच्या वेगाने त्यावर हल्ला करू शकते आणि लेसर बीमने ते नष्ट करू शकते. जर लेसर बीमने वॉरहेडला लक्ष्य केले तर प्रभावी परिणाम मिळू शकतात.
सैन्यासाठी कसे फायदेशीर ठरेल
आधारित शस्त्र प्रणालीची चाचणी आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील नॅशनल ओपन एअर रेंज येथे करण्यात आली. या प्रणालीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला कोणत्याही दारूगोळा किंवा रॉकेटचा वापर करण्याची आवश्यकता नाही; ते फक्त प्रकाशाने हल्ला करेल. ते एकाच वेळी ड्रोन हल्ल्यांचा समूह नष्ट करू शकते. आवाजाशिवाय, धूराशिवाय, शत्रूला लक्ष्य करेल. युद्धभूमीवर जलद प्रतिसाद आणि स्वस्त देखभालीची व्यवस्था, म्हणजेच ती एक किंवा दोन लिटर पेट्रोलच्या किमतीपेक्षा कमी किमतीत चालवता येते, ही त्याची वैशिष्टय़े आहेत.
n संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) लेझर आधारित शस्त्र विकसित केले आहे. ते आता लष्करातील वापरासाठी सज्ज होणार आहे. डीआरडीओच्या कामगिरीने हिंदुस्थान अमेरिका, चीन आणि रशियासह प्रगत लेसर शास्त्र क्षमता असलेल्या देशांच्या उच्चभ्रू गटात हिंदुस्थानचा समावेश झाला आहे.