बाबा लगीन… हिंदुस्थानींचा शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च

हिंदुस्थानातील लोक शिक्षणापेक्षा जास्त खर्च लग्न समारंभावर करतात, अशी माहिती गुंतवणूक संस्था जेफरीजने केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. हिंदुस्थानात एका लग्नावर सरासरी शिक्षणापेक्षा जास्त खर्च करायला लोक प्राधान्य देतात. हिंदुस्थानातील विवाह बाजार 10.9 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. हा बाजार सध्या चीनपेक्षा कमी असला तरी अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. हिंदुस्थानी लोक हे किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च हे लग्नावर करतात. हिंदुस्थानींचे सरासरी वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये असून ते यापेक्षा किती तरी पट लग्नावर खर्च करतात. हिंदुस्थानात दरवर्षी जवळपास 80 लाख ते 1 कोटी विवाह होतात. ज्वेलरी उद्योगात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पैसा हा वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून होतो. लग्नसराईसाठी लागणाऱया अनेक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्याने लग्न खर्च वाढला आहे.