कोलंबसआधी हिंदुस्थानी व्यक्तीनं लावला अमेरिकेचा शोध! शिक्षणमंत्र्यांनी शिकवला वेगळाच इतिहास

अमेरिकेचा शोध क्रिस्टोफर कोलंबसने तर हिंदुस्थानचा शोध वास्को द गामा याने लावल्याचा इतिहास आपण शिकत आलेलो आहोत. मात्र मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी वेगळाच इतिहास शिकवला असून कोलंबसच्या कित्येत पिढ्या आधी हिंदुस्थानी व्यक्तीने अमेरिकेचा शोध लावला होता. मात्र आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला, असे ते म्हणाले. त्यांच्या या जावईशोधाची सध्या चर्चा सुरू आहे.

आठव्या शतकामध्ये हिंदुस्थानी लोक कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो नावाच्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे मंदिरं बांधली. याचा पुरावा अमेरिकेच्या संग्रहालयात आणि ग्रंथालयात आहे, असा दावाही शिक्षणमंत्री Inder Singh Parmar यांनी केला. विशेष म्हणजे भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

अमेरिकेत पोहोचलेल्या हिंदुस्थानी लोकांनी तिथली अर्थव्यवस्था बळकट केली. हिंदुस्थानी लोकांनी माया संस्कृतीतील लोकांना अमेरिकेला भांडवलशाही देश बनवण्यात मदत केली. माया संस्कृती ही हिंदुस्थानचा विचार आणि सभ्यतेची पद्धत असून त्याबाबत विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी अमेरिकेचा शोध लावला होता, इटालीयन क्रिस्टोफर कोलंबस याने नाही, असेही ते म्हणाले.

ते पुढे असेही म्हणाले की, पोर्तुगालच्या वास्को द गामा याने हिंदुस्थानचा शोध लावल्याचे शिकवले जाते. मात्र हे खोटे असून वास्को द गामा हा चंदन नावाच्या एका हिंदुस्थानी व्यापाऱ्याच्या मागे इथे आलेला. चंदन यांचे जहाज वास्को द गामाच्या जहाजापेक्षा चार पट मोठे होते.