नुकतेच अमेरिकेमधून 100 हून अधिक बेकायदेशीर हिंदुस्थानी स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले. याविरोधात राज्यसभेत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. झालेल्या घटनेसंदर्भातील चर्चेत, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, अमेरिकेकडून केलेल्या या अशा कृती नवीन नाहीत. गेल्या 15 वर्षात हद्दपार केलेल्या हिंदुस्थानींची आकडेवारी यावेळी त्यांनी उघड केली. 2009 पासून अमेरिकेतून एकूण 15 हजार 756 बेकायदेशीर हिंदुस्थानी स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले आहे, असे मंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले.
जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘जर कोणताही नागरिक परदेशात बेकायदेशीरपणे राहत असेल तर त्याला परत (देशात) बोलावणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे.’ परराष्ट्र मंत्री म्हणाले, ‘भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे 2009 पासून घडत आहे. गेल्या 15 वर्षांत 756 भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. 2019 मध्ये भारतात निर्वासित करण्यात आलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या 2,042 होती.
हिंदुस्थानी आपल्या धर्तीवर उतरताच, त्यांना अमेरिकेतून हिंदुस्थानात कसे परत पाठवले, याबद्दल अनेक भयानक कथा समोर आल्या. यूएस बॉर्डर पेट्रोलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्थलांतरितांना हातकड्या आणि त्यांच्या पायांना बेड्या घालून फिरण्यास भाग पाडले जात असल्याचे दिसून आले आहे. या हद्दपारीच्या पद्धतीमुळे राज्यसभेत विरोधी पक्षातील खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी असाही प्रश्न उपस्थित केला की केंद्र सरकार “मानवीय पद्धतीने” आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विमान का पाठवू शकत नाही.
“आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत, जेव्हा कोलंबियासारखे देश, जे पहिल्या 10 मध्येही स्थान मिळवत नाहीत, ते विमान पाठवू शकतात आणि त्यांच्या नागरिकांना सन्मानाने परत आणू शकतात, तेव्हा आपल्या सरकारने का विमान पाठवले नाही?” असे तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी म्हटले.
संसदेत या टीकेला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, “अमेरिकेकडून होणारे हद्दपारीचे आयोजन आणि अंमलबजावणी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) अधिकाऱ्यांद्वारे केली जाते. ICE द्वारे वापरल्या जाणाऱ्या विमानांद्वारे हद्दपारीसाठी मानक कार्यप्रणाली 2012 पासून प्रभावी आहे.
104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले, डोनाल्ड ट्रम्प सरकारने हद्दपार केलेल्या भारतीयांची ही पहिली तुकडी होती. पैकी 33 जण हरियाणा आणि गुजरातमधील, 30 जण पंजाबमधील, प्रत्येकी तीन जण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आणि दोन जण चंदीगडमधील आहेत.
अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची वर्षनिहाय आकडेवारी:
2009: 734
2010: 799
2011: 597
2012: 530
2013: 515
2014: 591
2015: 708
2016: 1,303
2017: 1,024
2018: 1,180
2019: 2,042
2020: 1,889
2021: 805
2022: 862
2023: 617
2024: 1,368
2025 ( 5 फेब्रुवारीपर्यंत): 104