पुतीन लष्कराने युक्रेनविरुद्ध युद्धात उतरवले, हिंदुस्थानचे तरुण रशियात अडकले

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत जवळपास तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. काही महिन्यांपासून केरळमधील दोन तरुण हिंदुस्थानात परत येण्यासाङ्गी धडपड करत आहेत. हे दोघेही एप्रिल महिन्यात रशियाला गेले होते. रशियात प्लंबर आणि ड्रायव्हरची नोकरी मिळेल या आशेने ते रशियाला गेले. परंतु पुतीन यांच्या लष्कराने या दोन तरुणांना युक्रेनविरुद्धच्या युद्धाच्या लढाईत उतरवले आहे. बिनिल टीबी (32) आणि त्याचा मावस भाऊ जैन टिके (27) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघेही केरळच्या त्रिशूरच्या वडक्कनचेरी येथील मूळ रहिवासी आहेत. बिनिलने एका इंग्रजी वृत्तपत्राला पाठवलेल्या व्हाईस मेसेजमधून सुटका करण्याची विनंती केली आहे. या दोघांनाही सप्टेंबर महिन्यांपासून हिंदुस्थानात यायचे

आहे. यासाठ त्यांनी मॉस्को येथील हिंदुस्थानी दूतावासाचा दरवाजा ठोठावला आहे, परंतु त्यांना अद्याप यश आले नाही. ऑगस्टच्या अखेरमध्ये एकाला कॅम्पमधून फोन करण्यात यश आले. याआधी त्रिशूरच्या संदीप नावाच्या एका तरुणाचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे. देशात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणाऱ्या बिनिलने मेसेजमध्ये म्हटले की, आम्ही मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही गोष्टीत थकलो आहोत. आम्ही रशियाच्या कब्जातील युक्रेनच्या परिसरात आहोत. आमच्या कमांडकरचे म्हणणे आहे की, आमचे एक वर्षाचे कॉन्ट्रक्ट आहे. आमच्या सुटकेसाठी आम्ही हिंदुस्थानच्या दूतावासाकडे विनंती करत आहोत. परंतु जोपर्यंत रशियन लष्कर तुमची मुक्तता करत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, असे दूतावासाने म्हटले आहे.

पैशाचे आमिष दाखवून फसवणूक

बिनिल आणि जैन यांच्यासह 100 हून अधिक हिंदुस्थानींचा यात समावेश आहे. गरीब कुटुंबातील तरुणांना मोठ्या सॅलरीचे आमिष दाखवून रशियाला नेण्यात आले आहे. 2.5 लाख रुपये प्रति महिना पगार देऊ असे तरुणांना सांगण्यात आले होते, परंतु नंतर या तरुणांना युद्धात उतरवले.