गतविजेत्या अन् यजमान हिंदुस्थानने गुरुवारी पाहुण्या थायलंड संघाला महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत हॉकीचे चांगलेच धडे शिकविले. हिंदुस्थानने या एकतर्फी लढतीत थायलंडची 13-0 गोलफरकाने दाणादाण उडविली. हरयाणाच्या दीपिकाने सर्वाधिक 5 गोल करीत हिंदुस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयाच्या हॅट्ट्रिकसह हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीत गेल्यात जमा आहे.
पहिल्या मिनिटापासून आक्रमक झालेल्या हिंदुस्थानच्या रणरागिणींपुढे थायलंडच्या महिला हतबल दिसल्या. मांजर आणि उंदराच्या लढतीप्रमाणे अगदीच एकतर्फी झालेल्या या लढतीत हिंदुस्थानी महिलांनी दे दणादण गोल ठोकले. दीपिकाने तिसऱ्या, 19व्या, 43व्या, व 45व्या मिनिटाला दोन असा गोलचा पंच लगावला. प्रीती दुबे (55व्या व 58व्या मिनिटाला), लालरेमसियामी (12व्या व 56व्या मिनिटाला) व मनीषा चौहान (55व्या व 58व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी 2 गोल केले. याचबरोबर ब्युटी डूंग डूंग (30व्या मिनिटाला) व नवनीत कौर (53व्या मिनिटाला) यांनीही एक-एक गोल केला.
गुणतक्त्यात चीनशी बरोबरी, पण..
या स्पर्धेत हिंदुस्थान व चीन या संघांनी विजयाच्या हॅट्ट्रिकसह प्रत्येकी 9 गुणांची कमाई केली आहे. गुणतक्त्यात उभय संघ बरोबरीत असले तरी गोल अंतराने चीन सरस असल्याने सध्या तरी हिंदुस्थानी संघ दुसऱ्या स्थानावर आहे. चीनने तीन लढतीत 22 गोल केले असून, केवळ एक गोल स्वीकारला आहे, दुसरीकडे हिंदुस्थानने तीन लढतीत 20 गोल केले असून, 2 गोल स्वीकारले आहेत. म्हणजेच या घडीला चीनकडे 21, तर हिंदुस्थानकडे 18 गोल आहेत. मलेशियन संघ एक विजय व दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानी आहे. याचबरोबर जपान, दक्षिण कोरिया व थायलंड यांची विजयाची पाटी अद्याप कोरी असून, ते गुणतक्त्यात अनुक्रमे चार ते सहा स्थानावर आहेत.