
हिंदुस्थानी महिलांची दिवसातील 4 तास 45 मिनिटे रांधा, वाढा, उष्टी काढण्यात खर्च होत आहेत. हे प्रमाण घरातील पुरुषांपेक्षा 3 तास 21 मिनिटांनी अधिक आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जानेवारी ते डिसेंबर, 2024 या कालावधीकरिता केलेल्या ‘टाईम यूज’ सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे. घरातील सदस्यांच्या शुश्रूषेवरही महिला पुरुषांपेक्षा अधिक वेळ म्हणजे दिवसाला 62 मिनिटे खर्ची करतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे 2019च्या तुलनेत महिलांनी घरगुती कामांसाठी दिल्या गेलेल्या वेळेत 10 मिनिटांची कपात झाली आहे. 15 ते 59 वयाच्या महिला घरगुती कामांना सर्वाधिक म्हणजे दिवसाला 5 तास पाच मिनिटे खर्च करतात. 83.9 टक्के महिलांनी एकही दिवस न चुकता घरातील कामे केली आहेत. या पाहणीत 2,39, 487 कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला. त्यापैकी 83,247 ही ग्रामीण आणि 56,240 ही शहरी कुटुंबे होती. सहा वर्षांहून अधिक वयाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी बोलून ही माहिती गोळा करण्यात आली. मुले, अपंग, वृद्ध, रुग्ण यांची काळजी, स्वयंपाक, बाजारहाट अशा विविध घरगुती कामांचा यात विचार करण्यात आला. थोडक्यात, महिला आणि पुरुषांच्या पगारी आणि बिनपगारी कामाचा लेखाजोखा यात घेण्यात आला आहे.
भरपगारी कामांमध्ये पुरुष आघाडीवर
भरपगारी कामांचा विचार करता पुरुष महिलांच्या तुनलेत दोन तास 12 मिनिटे अधिक खर्च करतात. म्हणजेच महिला सरासरी 5 तास 41 मिनिटे खर्च करतात, तर पुरुष 7 तास 53 तास खर्च करतात.
महिलांचे नोकरीचे प्रमाण वाढले
महिलांचे भरपगारी काम करण्याचे म्हणजेच नोकरी करण्याचे प्रमाणही 2019च्या तुलनेत वाढल्याचे दिसून येते. 2019मध्ये ते 17.1 टक्के होते. 2024मध्ये 20.6 टक्के इतके वाढले. दुसरीकडे पुरुषही घरातील कामाला हातभार लावताना दिसतात. हे प्रमाण 43.9 टक्क्यांवरून 45.8 टक्क्यांवर गेल्याचे दिसते.
दिवसाचे कामाचे तास वाढले
एका दिवसात रोजगार आणि संबंधित कामांमध्ये घालवलेला वेळ महिलांमध्ये 5 तास 33 मिनिटांवरून 5 तास 41 मिनिटांपर्यंत वाढला, तर पुरुषांसाठी तो 7 तास 39 मिनिटांवरून 7 तास 53 मिनिटांपर्यंत वाढला आहे.