
देशात महागाई इतकी वाढली आहे की महिलांना आपले मंगळसूत्र गहाण ठेवावे लागतेय. गेल्या काही वर्षांत सोने तारण कर्ज घेणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. मोदीजी तुम्ही म्हणाला होतात, महिलांचे मंगळसूत्र चोरी होत आहे, आता तुमचे विधान खरे होताना दिसत आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक्सवरून हल्ला चढवला.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकड्यांचा हवाला खरगे यांनी दिला. मोदींनी निवडणूक सभांमध्ये देशाची संपत्ती लुटण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचे मानणाऱ्या काँग्रेसची नजर आता मंगळसूत्रावर आहे अशी टीका केली होती. त्या विधानावरून खरगे यांनी मोदींना टोला लगावला. 2019 ते 2024 दरम्यान चार कोटी महिलांनी सोने तारण ठेवून 4.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले. 2024मध्ये घेतलेल्या एकूण कर्जात 38 टक्के वाटा सोने तारण कर्जाचा आहे, असे खरगे म्हणाले.
गोल्ड लोनमध्ये वर्षभरात 71.3 टक्के वाढ
2025मध्ये रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गोल्ड लोनमध्ये केवळ वर्षभरात तब्बल 71.3 टक्क्यांची मोठी वाढ झाल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. नोटबंदी करून महिलांचे स्त्राr धन पळवले, आता महागाई आणि गृहिणींच्या किचनचे बजट कोलमडल्यामुळे त्यांना आपली आवडती गोष्ट म्हणजेच सोने तारण ठेवून खर्च काढावे लागत आहे, असेही ते म्हणाले.