आयसीसीचा वर्ल्ड कप कोणताही असो, संघ पुरुषांचा असो किंवा महिलांचा. हिंदुस्थानसमोर पाकिस्तानचे काहीएक चालत नाही हे हिंदुस्थानी महिला संघानेही दाखवून दिले. सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून मार खाणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनी आपला सर्व राग पाकिस्तानी संघावर काढला. अरुंधती रेड्डीसह हिंदुस्थानी माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्यामुळे हिंदुस्थानी संघाने टी-20 वर्ल्ड कपच्या साखळी लढतीत 6 विकेट आणि 7 चेंडू राखून सहज विजयाची नोंद केली. आता बुधवारी श्रीलंकेविरुद्ध तिसरा साखळी सामना खेळला जाणार आहे.
शेफाली-जेमिमा-हरमनप्रीतमुळे हिंदुस्थानच्या डावाला मजबुती
न्यूझीलंडविरुद्ध अनपेक्षित पराभवाचा धक्का बसल्यामुळे हिंदुस्थानी महिला संघ काहीसा हादरला होता. त्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडल्यासाठी पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानला विजयाच्या स्फूर्तीची गरज होती आणि ती स्फूर्ती अरुंधती आणि श्रेयंकाच्या माऱ्यामुळे हिंदुस्थानी संघाला सहज लाभली. स्मृती मानधना (7) लवकर बाद झाली असली तरी शेफाली वर्मा (32), जेमिमा रॉड्रिग्ज (23), हरमनप्रीत कौर (29) यांच्या दमदार आणि जोरदार फटकेबाजीमुळे हिंदुस्थानी संघाने 106 धावांचे विजयी लक्ष्य आरामात 19 व्या षटकांत गाठले.
सजीवन सजनाने निदा दारला खणखणीत चौकार खेचत हिंदुस्थानी संघाच्या वर्ल्ड कप विजयाचा श्रीगणेशा केला. पाकिस्तानी कर्णधार फातिमा सानाने सलग चेंडूंवर जेमिमा आणि रिचा घोषला बाद करून हिंदुस्थानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण कर्णधार हरमनप्रीतने सानाचा हा प्रयत्न हाणून पाडला. संघाला विजयासमीप पोहोचविल्यानंतर हरमनप्रीतच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे तिने जखमी निवृत्ती पत्करली.
हिंदुस्थानी आक्रमणापुढे पाकिस्तानी हतबल
त्याआधी गोलंदाजांच्या यशामुळे पाकिस्तानचा संघ 105 धावांपर्यंत मजल मारू शकला होता. इथेच हिंदुस्थानने अर्धी लढाई जिंकली होती आणि अर्धी लढाई फातिमा सानाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हिंदुस्थानी गोलंदाजांनी तो त्यांच्यावरच उलटवला. रेणुका सिंहने आपल्या पहिल्याच षटकात गुल फिरोजाचा त्रिफळा उद्ध्वस्त करत पाकिस्तानला हादरवले. त्यानंतर शेफाली शर्मा, अरुंधती आणि श्रेयांका पाटीलने एकेक धक्के देत पाकिस्तानी डावाला सावरण्याची संधी दिली नाही.
निदा दारने 28 धावा करत संघाला शतकासमीप नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अरुंधतीने अत्यंत अचूक मारा करत ओमाईमा सोहैल आणि आलिया रियाज यांचा अडसर दूर करत पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट केली. अरुंधतीच्या या माऱ्यामुळे पाकिस्तानच्या डावाला समाधानकारक मजल मारताच आली नाही. अरुंधतीने 19 धावांत 3 तर श्रेयांकाने 12 धावांत 2 विकेट घेत आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. हिंदुस्थानी माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज अक्षरशा हतबल दिसल्यामुळे वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला पाकविरुद्धची क्रिकेट लढत सहज जिंकता आली.