Under-19 Women’s World Cup 2025 मलेशियातील क्वलालंपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणात करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी निक्की प्रसादच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. नुकताच 19 वर्षांखालील आशिया चषक टीम इंडियाच्या महिला संघाने पटकावला होता. या विजेत्या संघातील अनेक खेळाडूंना वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या संघात निवडण्यात आले आहे.
टीम इंडियाने आशिया चषकामध्ये धमाकेदार प्रदर्शन केले होते. जी त्रिशाने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अंतिम सामन्यातही तिने 52 धावांची खेळी केली होती. तसेच पाकिस्तानविरुद्ध अटीतटीच्या लढतीती कमलिनीने ताबडतोब फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर पार पडलेल्या WPL च्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्सने कमलिनीला 1.60 कोटींना खरेदी केले आहे. या दोघींचीही वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच उपकर्णधार पदाची जबाबदारी सानिका चाळकेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
महिला विश्वचषकाला 19 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. 2 फेब्रुवारीला स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. 19 ते 23 जानेवारी साखळी फेरीतील सामने, 25 ते 29 जानेवारी सुपर सिक्स आणि 31 जानेवारीला सेमी फायनलचा सामना पार पडेल. एकून 16 संघ या स्पर्धेत आपलं नशीब आजमावणार असून त्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडियाचा समावेश अ गटामध्ये करण्यात आला असून अ गटात टीम इंडिया व्यतिरिक्त मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
टीम इंडियाचा संघा – निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, जी कमलिनी (यष्टीरक्षक), भाविका अहीरे (यष्टीरक्षक), इश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि एस वैष्णवी यांचा समावेश आहे.