सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानकडून पराभव झेलणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने जपानची 211 धावांनी धूळधाण उडवत 19 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषकात आपला पहिला विजय नोंदविला. तसेच पाकिस्तानने यूएईचा 69 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर आता हिंदुस्थानला बुधवारी यूएईविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारावी लागणार आहे. तसेच ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी सलग दोन विजयांसह आपले उपांत्य फेरीत फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात हिंदुस्थानी संघाला 43 धावांनी हार पत्करावी लागली होती. या विजयामुळे पाकिस्तानी संघाचे मनोधैर्य उंचावले, तर हिंदुस्थानी खेळाडू नाराज झाले होते. पण आज कर्णधार मोहम्मद अमानने 122 धावांची खणखणीत नाबाद खेळी करत हिंदुस्थानला 6 बाद 339 अशी जबरदस्त मजल मारून दिली होती. मुंबईकर आयुष म्हात्रेने 29 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकार खेचत झंझावाती सलामी दिली होती.
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 23 धावा करत आयुषसह 65 धावांची भागी रचली. 22 षटकांत 3 बाद 139 धावा करणाऱ्या हिंदुस्थानला 28 षटकांत 200 धावा काढून देण्याची करामत करताना कर्णधार अमानने केपी कार्तिकेयबरोबर (57) चौथ्या विकेटसाठी 122 धावांची भर घातली. या भागीमुळे हिंदुस्थान मोठी धावसंख्या उभारू शकला. जपानला हिंदुस्थानचे 340 धावांचे आव्हान पेलवलेच नाही. ह्युगो केली (50) आणि चार्ल्स हिंझ (ना. 35) यांनी समाधानकारक खेळ केला. जपानच्या 8 फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. परिणामतः दुबळ्या जपानने 50 षटके फलंदाजी करत केवळ 128 धावाच केल्या.