![champion trophy (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/champion-trophy-1-696x447.jpg)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी संघाने रविवारपासून सरावाला प्रारंभ केलाय. दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सुरू असलेल्या या सरावात सोमवारी दुबईमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू सरावासाठी मैदानावर उतरले. दरम्यान, रोहित आणि हार्दिक पंड्याने तुफानी शैलीत फटकेबाजी करत कसून सराव केला.
रविवारी हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला सराव सोडून काही वेळ उपचार घ्यावे लागले. आधीच टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा जायबंदी झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकलाय. नशीब आज पंतला गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे कसून सराव करा, पण जपून करा असा सल्ला टीम इंडियाला द्यावा वाटतोय. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेला हिंदुस्थानी संघ गुरुवारपासून (दि. 20) बांगलादेशविरुद्धच्या लढतीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहे.
आज विराटसोबत गिल आणि श्रेयस अय्यर यांनीही फलंदाजीत चांगलाच घाम गाळलाय. रोहित शर्माने नेटमध्ये खूप घाम गाळला. तो फिरकी गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाजांविरुद्धही खेळताना दिसला. शुभमन गिल आणि विराट कोहली यांनीही नेट सेशनमध्ये चांगली फटकेबाजी केली. या वेळी कोहलीने गिलला अनेक टिप्सही दिल्या. स्फोटक फलंदाज श्रेयस अय्यरनेही खूप घाम गाळला. हार्दिक पंड्या फॉर्ममध्ये दिसत होता. फलंदाजी करताना तो मोठ्या फटक्यांवर काम करताना दिसला. बीसीसीआयने ‘एक्स’ या आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू सरावासोबतच मस्ती करतानाही दिसले.
फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच खेळाडूंनी क्षेत्ररक्षणावरही काम केले. या वेळी हिंदुस्थानी संघाचा सपोर्ट स्टाफ खेळाडूंसोबत दिसला. वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा मैदानावर एकत्र दिसले. हिंदुस्थानला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेचे दोन उपांत्य सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील. अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
राखीव खेळाडू – यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे.