कॅनडामध्ये 21 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीची हत्या; बस स्थानकावर उभी असताना घातली गोळी, कारणही आलं समोर

कॅनडामध्ये हिंदुस्थानी नागरीक आणि उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ले वाढत चालले आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये हिंदुस्थानींना लक्ष्य केले जात आहे. अशातच कॅनडातील ओंटारियो भागातील हॅमिल्टन येथे हिंदुस्थानी विद्यार्थिनीला बस स्थानकावर उभी असताना गोळी घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हरसिमरत रंधावा (वय – 21) असे असे मृत तरुणीचे नाव आहे. टोरंटोतील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने शुक्रवारी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

ओंटोरियोमधील हॅमिल्टन येथे हिंदुस्थानी विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा हिच्या मृत्यूमुळे अतिव दु:ख झाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कार चालकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला आणि यातील एक गोळी लागून हरसिमरत हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत असून आरोपींची ओळख पटण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आम्ही हरसिमरत हिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, असे ट्विट हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने केले आहे.

हरसिमरत मंधावा ही कॅनडातील ओंटारियो येथील मेहॉक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. बस स्थानकावर उभी असताना समोरून जाणाऱ्या कारमधून झाडलेली गोळी तिला लागली आणि यातच तिचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती हॅमिल्टन पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. घटनास्थळी हरसिमरत रंधावा ही रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. बेशुद्धावस्थेत असतानाच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गोळी छातीतून आरपार गेल्याने उपचारांपूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, पोलीस घटनास्थळाच्या आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही तपासत आहे. याद्वारे कारचा नंबर आणि कार चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.