किचनमध्ये झालेल्या वादातून एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच कॅनडामध्ये आणखी घटना घडली आहे. कॅनडातील एडमोंटन परिसरात शुक्रवारी आणखी हिंदुस्थानी विद्यार्थ्याची कामाच्या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. हर्षदीप सिंह असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हर्षदीप सिंह हा सुरक्षारक्षक म्हणून एका अपार्टमेंटमध्ये काम करत होता. शुक्रवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हर्षदीप ऑनड्युटी असताना तीन अज्ञात लोक आले आणि त्यांनी आधी हर्षदीपला मारहाण केली. त्यानंतर एकाने त्याला गोळी घातली. यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले.
हर्षदीपला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एडमोंटन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हर्षदीपची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. पोलीस तपास करत आहेत.