म्यानमारमध्ये माणुसकीचे दर्शन! भूकंपग्रस्त भागात हिंदुस्थानी जवानांचे दिवसरात्र मदतकार्य

भूकंपग्रस्त मंडालेमध्ये हिंदुस्थानी जवानांचे मदत आणि बचावकार्य अथकपणे सुरू आहे. विनाशाच्या काळात श्रद्धा आणि माणुसकीचे दर्शन घडत आहे. म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेच्या भयंकर भूकंपात मृतांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली आहे. मंडालेमधील स्ट्रीट 86 ए येथे नमाज सुरू असताना सुमारे 50 लोक गाडले गेले. तिथे एनडीआरएफच्या पथकाला सुरुवातीला स्थानिकांकडून विरोध झाला. तरीही बचाव पथकाने शांतपणे आपले काम सुरू केले.

एनडीआरएफच्या जवानाने दिलेल्या माहितीनुसार, नमाजाच्या स्थितीत बसलेली एक महिला तिच्या बाळासोबत ढिगाऱ्यात दबलेली होती. तिचा मृतदेह बाहेर काढणे जिकिरीचे काम होते. एनडीआरफच्या जवानांनी खबरदारी घेत तिचा मृतदेह काढण्याची तयारी केली, पण थोडावेळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला. महिलेच्या शोकाकुल कुटुंबाने जवानांना विरोध केला आणि मृतदेह स्वतःच बाहेर काढण्याचा निर्धार केला व तसा प्रयत्न कुटुंबीयांनी केला, पण त्या कामात अडचणी येत होत्या. त्यांच्याकडे कौशल्याची कमतरता आहे हे लक्षात येताच ते मागे हटले. त्यांनी एनडीआरएफच्या जवानांकडे मदतीच्या दृष्टीने पाहिले. त्यानंतर जवानांनी त्यांचे काम पुन्हा सुरू केले आणि काळजीपूर्वक महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

‘मदत स्वीकारण्यास संकोच करणारे तेच आवाज आता कृतज्ञतेचे शब्द बोलत होते, असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एनडीआरएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एनडीआरएफ पथक मंडाले येथे 11 ठिकाणी काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे 30 मृतदेह बाहेर काढले आहेत. ‘‘हिंदुस्थानने केलेल्या प्रयत्नांवर आम्ही खूप समाधानी आहोत. गंभीर जखमी झालेल्या माझ्या मुलीवर हिंदुस्थानी लष्कराने स्थापन केलेल्या फील्ड हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली,’’ असे स्थानिक रहिवाशी अद्दाम हुसेन यांनी सांगितले. एनडीआरएफ पथक 24-25 बेपत्ता लोकांचा शोध घेत असताना भावुक होऊन एका वृद्ध व्यक्तीने हिंदुस्थानी बचावकर्त्यांचे कौतुक करत आशीर्वाद दिल्याची माहिती जवानांनी दिली.

‘ऑपरेशन ब्रह्मा’

भूकंपानंतर लगेचच हिंदुस्थानने ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू केले, ज्याअंतर्गत औषधे, रेशन, अन्न आणि तंबू पाठवण्यात आले. या मोहिमेंतर्गत, हिंदुस्थानी लष्कराने शहरात एक फील्ड हॉस्पिटल स्थापन केले. पहिल्या दोन दिवसांत सुमारे 200 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ‘‘रुग्णालयाबद्दल कळल्यापासून स्थानिक लोक येथे येत आहेत. भूकंपग्रस्तांव्यतिरिक्त, इतर लोकांनीही उपचार घेतले आहेत आणि आम्ही त्यांच्यावर आनंदाने उपचार करत आहोत,’’ 60 पॅरा फील्ड हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जगनीत गिल यांनी सांगितले.