जीवघेण्या ‘शिगेला’ आजारावर लस

नवजात बालकांमध्ये ‘शिगेला’ बॅक्टेरियामुळे शिगेलोसिसचा आजार होतो. आतडय़ांवर गंभीर परिणाम करणारा हा पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना होणारा जीवघेणा आजार आहे. 128 वर्षे जुन्या आजारावर लस शोधण्यात हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना यश आलेय. शिगेलावर पहिली स्वदेशी लस लवकरच बाजारात येईल. जगात पहिल्यांदा 1896 साली जपानचे मायक्रोबायोलॉजिस्ट कियोशी शिगा यांनी या आजाराचा शोध लावला. त्यामुळे या आजाराचे नाव ‘शिगेला’ असे देण्यात आले. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो. प्रदूषित अन्न आणि पाण्यामुळे याची लागण होते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) गेल्या अनेक वर्षांपासून या आजारावर लस शोधत आहे. या प्रयत्नांना आता यश आलेय. ‘शिगेला’ बॅक्टेरियाशी लढणारी स्वदेशी लस तयार झालीय, जी बॅक्टेरियाच्या 16 वेरिएंटवर प्रभावशाली आहे.

गंभीर लक्षणे

‘शिगेला’ बॅक्टेरियामुळे आतडय़ांना संसर्ग होतो. संसर्ग झाल्यानंतर एक-दोन दिवसांनंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. उलटय़ा, जुलाब आणि कमजोरी होऊन परिस्थिती जीवघेणी होण्याची शक्यता असते. हिंदुस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी याची प्रकरणे समोर आली आहेत.