हिंदुस्थानी संशोधकाला अमेरिकेत अटक, ‘हमास’शी संबंध असल्याचा आरोप

हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिल्याप्रकरणी हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा व्हिसा अमेरिकेने रद्द केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता हमासशी संबंध ठेवल्याचा आणि या संघटनेचा प्रचार केल्याचा आरोप ठेवत जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका हिंदुस्थानी संशोधकाला अटक करण्यात आली आहे. बदर खान सुरी असे अटक करण्यात आलेल्या संशोधकाचे नाव असून त्याला हिंदुस्थानमध्ये पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोस्ट डॉक्टरल फेलो बदर खान सुरी हा जॉर्जटाऊन विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. सोशल मीडियावर हमासचा प्रचार आणि यहूदींविरोधी भावनांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. सोमवारी रात्री व्हर्जिनियातील घराबाहेरून त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे.

बदर खान सुरी याचे मफेज साहेल हिच्याशी लग्न झालेले आहे. मफेज साहेल ही अमेरिकन नागरीक आहे. ती मूळची गाझाची रहिवासी असून सध्या जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. अज जझीरा आणि फिलिस्तिनी मिडिया आऊटलेटसाठीही ती लेख लिहिते. तसेच गाझामध्ये परराष्ट्र मंत्रालयासोबतही तिने काम केलेले आहे. तिने नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातूनही पदवी घेतलेली आहे.

हमासच्या वरिष्ठ सल्लागाराशी बदर खान सुरी याचे जवळचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर आयएनए कलम 237(a)(4)(C)(i) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. इराक आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यावर डॉक्टरेट संशोधन सुरू ठेवण्यासाठी बदर खान सुरी यांना अमेरिकेकडून व्हिसा देण्यात आला होता, असे जॉर्जटाऊनच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनामध्ये म्हटले.

दरम्यान, याआधी कोलंबिया विद्यापाठीमध्ये डॉक्टरेट पदवी असलेल्या 37 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवास यांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. फिलिस्तानी समर्थकांसोबत निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. 5 मार्च 2025 रोजी परराष्ट्र विभागाने त्यांचा व्हिसा रद्द केला होता.