वंदे भारत, राजधानी, शताब्दीमुळे रेल्वेच्या कमाईत भरभराट; महसूल 30 ते 60 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

गतिमान प्रवासाची क्षमता तसेच आलिशान रचना असलेल्या वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्स्प्रेस यांसारख्या ट्रेनमुळे रेल्वेच्या कमाईत चांगलीच भरभराट झाली आहे. चेअर कार्स आणि स्लीपर्सचा अंतर्भाव असलेल्या या गाडय़ांना प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात रेल्वेच्या महसुलात जवळपास 30 ते 60 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत प्रवासी सेवा अद्ययावत करण्यावर भर दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘वंदे भारत’सारख्या आलिशान गाडय़ा प्रवासी सेवेत उतरवल्या असून त्यांचा सकारात्मक परिणाम महसुलामध्ये दिसून येत आहे. रेल्वेच्या देशभरातील महसुलाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2×2 आसन रचना असलेल्या ‘वंदे भारत’सारख्या गाडय़ांतील एक्झिक्युटिव्ह क्लास व्यवस्थेने रेल्वेची तिजोरी भक्कम केली आहे. याच जोरावर या श्रेणीतील रेल्वेच्या महसुलात आगामी आर्थिक वर्षात 56 टक्क्यांची म्हणजेच जवळपास 987 कोटींपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात रेल्वेचा महसूल 698 कोटींवर पोचला आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवासी सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेचा महसूल विक्रमी पातळी गाठेल, असा विश्वास रेल्वेतील अधिकारी व्यक्त करीत आहेत.