गळा दाबला, भिंतीवर आपटलं; कॅनडामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या महिलेवर हल्ला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर हल्ला होणे नवीन नाही. मात्र आता कॅनडामध्येही असे हल्ले होऊ लागले आहेत. कॅनडातील कॅलगरीमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कॅलगरीतील वर्दळीच्या बो व्हॅली कॉलेज ट्रेन स्थानकावर हा प्रकार घडला असून याचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी 1.40 च्या सुमारास हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की निळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक उंचपुरा धिप्पाड माणूस हिंदुस्थानी वंशाच्या महिलेचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आधी तो महिलेचा गळा दाबतो, नंतर जॅकेट पकडून काचेच्या भिंतीवर आदळतो. विशेष म्हणजे हा प्रकार वर्दळीच्या रेल्वे स्थानकावर घडला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतरही तिच्या मदतीला कुणीही आले नाही.

दरम्यान, या हल्ल्यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी आरोपीला अटकही केली. ब्रेडन जोसेफ जेम्स फ्रेंच (वय – 31) असे आरोपीचे नाव आहे.