हिंदुस्थानी वंशाच्या रुबी ढल्ला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत; 9 मार्चला कॅनडामध्ये होणार निवड

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडो यांचा लिबरल पक्ष 9 मार्च रोजी आपला नवा नेता आणि देशाचा पंतप्रधान निवडणार आहे. या शर्यतीत पाच नावे आघाडीवर आहेत. त्यामध्ये तीन महिला असून हिंदुस्थानी वंशाच्या रुबी ढल्ला यांचेही नाव आहे.

माजी उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड आणि लिबरल पार्टीच्या सभागृह नेत्या करिना गुल्ड यांच्यासह रुबी ढल्ला यांच्या नावाचीही चर्चा आहे. इन्व्हेस्टमेंट बँकर मार्क कार्नी आणि उद्योगपती फ्रँक बेलिस हेदेखील कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.टडो यांनी 6 जानेवारी रोजी राजीनामा जाहीर केला. पुढील पंतप्रधान निवडून येईपर्यंत टडो कॅनडाचे पंतप्रधान असतील.

कोण आहेत रुबी ढल्ला

राजकारणात येण्यापूर्वी ढल्ला यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. ढल्लांनी 2003 मध्ये ‘क्यूं, किस लिए’ या चित्रपटात काम केले होते. 1993 मध्ये त्या मिस इंडिया, कॅनडा स्पर्धेच्या  उपविजेत्यादेखील होत्या. 2004 ते 2011 दरम्यान त्या खासदार होत्या.