युएई विमान दुर्घटनेत हिंदुस्थानी वंशाच्या डॉक्टरसह दोघांचा मृत्यू

संयुक्त अरब अमिरातीच्या रास अल खैमाह येथील किनाऱ्याजवळ विमान दुर्घटना घडल्याची घटना घडली आहे. विमान कोसळून झालेल्या अपघातात भारतीय वंशाच्या तरुण डॉक्टरसह दोघांचा मृत्यू झाला आहे. जनरल सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (GCAA) ने या विमान अपघाताची पुष्टी केली.

सुलेमान अल माजिद (26) असे त्या तरुण डॉक्टरचे नाव असून तो या विमानाचा सहवैमानिक होता. या अपघातात एका 26 वर्षीय पाकिस्तानी तरुणीचाही मृत्यू झाला. संयुक्त अरब अमिरातीमध्येच जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेला सुलेमान याने हे विमान आपल्या कुटुंबीयांसह फेरफटका मारण्यासाठी भाड्याने घेतले होते. त्याचे आई-वडील; तसेच लहान भाऊ या वेळी उड्डाण क्लबमध्ये हजर राहून हे उड्डाण बघत होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

या विमानाचा रेडिओ संपर्क तुटला आणि त्यानंतर आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विमानातील दोघेही जण मृत्युमुखी पडले, अशी माहिती दिली. सुलेमान हा लंडनमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता. याबाबत अधिक तपास सुरू आहे.