के-4 मिसाईलची यशस्वी चाचणी, नौदलाची ताकद वाढली; बीजिंग, इस्लामाबाद टप्प्यात

हिंदुस्थानी नौदलाने के- 4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी केली. नौदलात नुकतीच सामील झालेल्या ‘आयएनएस अरिघात’ या आण्विक पाणबुडीवरून ‘के- 4’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज 3500 किमी आहे. त्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. पश्चिम बंगालच्या विशाखापट्टणम किनाऱयावर ‘के-4’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यापूर्वी ‘नोटीस टू एयरमॅन’ जारी करण्यात आले. म्हणजे त्या भागातून उड्डाण घेणाऱया विमानांना सावध करण्यात आले. ‘के- 4 ’ मिसाईल 10 मीटर लांब आणि 20 टन वजनी आहे. पहिल्यांदा हे मिसाईल पाणबुडीवरून फायर करण्यात आले. 2010 साली याची डेव्हलपमेंट चाचणी झाली होती. त्यानंतर अर्धा डझनाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. आता सहा हजार टन वजनाच्या पूर्णपणे कार्यरत ‘आयएनएस अरिघात’ पाणबुडीतून ‘के- 4 ’बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी म्हणजे नौदल क्षमतेचा एक महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे. नौदलाने आतापर्यंत 3 आण्विक पाणबुडय़ा तयार केल्या आहेत. यापैकी एक अरिहंत कार्यान्वित झाली आहे, दुसरी अरिघात प्राप्त होणार आहे आणि तिसऱया ए3 ची चाचणी सुरू आहे. या पाणबुडय़ांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्रs डागता येतात.

शत्रूला धडकी भरणार

आयएनएस अरिघात पाणबुडीवरून सोडण्यात आलेल्या के- 4 बॅलेस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये बीजिंग आणि इस्लामाबाद येते. त्यामुळे नक्कीच शत्रूराष्ट्रांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आयएनएस अरिघात पाणबुडी दीर्घ काळ पाण्याखालून काम करू शकते. तसेच 50 दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली राहू शकते. चिनी गुप्तहेर उपकरणांपासून सहजरित्या हालचाल करू शकते.

कुठूनही मारा शक्य

कोलकाता ते बीजिंग हे अंतर अंदाजे 3288 किलोमीटर आहे. के 4 मिसाईल बंगालच्या उपसागरातून प्रक्षेपित केल्यास चीनचा मुख्य भूभाग, दक्षिण आणि पश्चिम भागात सहज पोहोचू शकते. गरजेनुसार ते थेट बीजिंगलाही धडकू शकते. मुंबई ते इस्लामाबाद हवाई अंतर 1600 किमी आहे. जर के- 4 मिसाईल अरबी समुद्रातून कुठूनही सोडले तरी पाकिस्तानची राजधानी उद्ध्वस्त करू शकते.