हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी नौदलाच्या ताफ्यात आणखी जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश केला जाणार आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 26 राफेल मरीनचा करार पुढील महिन्यात होणार असल्याचे सांगितले. एक पाणबुडी आणि 62 जहाजांची बांधणी सुरू असून, पुढील 10 वर्षांत 96 जहाजे व पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात असतील. फ्रान्ससोबत नेव्ही प्रकारातील 26 राफेल एमसाठीचा (मरीन) करार निश्चित होणार आहे. याशिवाय तीन स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या करारावर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. येत्या जानेवारीपर्यंत हा करार निश्चित होण्याची शक्यता असल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
तसेच डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक महिन्याला नौदलाच्या ताफ्यात एक जहाज समाविष्ट केले जाईल. हिंदुस्थानात बांधलेल्या पहिल्या अणुऊर्जित पाणबुड्यांना दोन महिन्यांपूर्वी सरकारकडून मंजुरी मिळाली होती. पहिली पाणबुडी कार्यान्वित होताच दुसरीदेखील केली जाईल. आम्ही अशा एकूण सहा पाणबुड्या करणार आहोत, असेही त्रिपाठी यांनी सांगितले.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहिली तर त्यांना जहाजे आणि पाणबुड्या कशा मिळतात, हा एक प्रश्नच आहे. चीन आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे त्रिपाठी यांनी पाकिस्तानच्या 50 जहाजांच्या नौदलाच्या ताफ्याबद्दलच्या प्रश्नावर म्हटले.
बुधवारी, 4 डिसेंबर रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे ओडिशातील पुरी येथे होणाऱ्या नौदल दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असतील. या सोहळ्यासाठी नौदल दलाकडून उत्सवाची तयारी आणि तालीम केली जात आहे.