आशियाई चॅम्पियन होण्यासाठी हॉकी ज्युनियर ओमानला

ओमान येथील मस्कतमध्ये 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ‘पुरुष ज्युनियर आशिया चषक 2024’ स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा ज्युनियर पुरुष हॉकी संघ ओमानला रवाना झाला आहे. ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत चार वेळा ‘चॅम्पियन’ असलेल्या हिंदुस्थानी संघाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुरुष ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानने आपला दबदबा कायम राखला आहे. या स्पर्धेत हिंदुस्थानने 2004, 2008, 2015 आणि 2023 या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. गतवर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा अंतिम सामन्यात 2-1 असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

यंदाच्या वर्षी या स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले आहेत. आपले जेतेपद कायम राखण्यासाठी ‘अ’ गटामध्ये हिंदुस्थानपुढे कोरिया, जपान, चायनीज तैपेई आणि थायलंडचे कडवे आव्हान असेल. दुसरीकडे ‘ब’ गटामध्ये पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, ओमान आणि चीन यांच्यात कडवी झुंज रंगणार आहे. कर्णधार आमीर अली आणि उपकर्णधार रोहितच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा संघ 27 नोव्हेंबरला थायलंडविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबरला जपानविरुद्ध सामना होईल. 30 नोव्हेंबर रोजी चायनीज तैपेई विरुद्ध लढत होणार आहे. शेवटचा गट फेरीचा सामना 1 डिसेंबर रोजी कोरियाविरुद्ध होणार आहे. 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हिंदुस्थानला अक्वल दोन स्थान निश्चित करावे लागतील.

या स्पर्धेसाठी आम्ही कठोर मेहनत केली आहे. स्पर्धेत येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हिंदुस्थानचा संघ सज्ज झाला आहे. संघाचा भर पहिल्या सामन्यापासूनच आहे. स्पर्धेत सर्वेत्तम कामगिरी करण्याबरोबर अंतिम फेरी गाठणे हे आमचे धेय्य आहे, असा विश्वास कर्णधार आमीर अलीने व्यक्त केला.