अमेरिकेने फक्त आमच्याच हातात बेड्या घातल्या, हिंदुस्थानची काहीच इज्जत नाही; पंजाबमधील तरुणाने सांगितले भयंकर वास्तव

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अवैध स्थलांतरितांची हकालपट्टी करत आहे. त्यांनी हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना बेडय़ा आणि साखळदंडाने जखडून लष्कराच्या विमानातून मायदेशात धाडले. हिंदुस्थानात परतलेल्या अवैध स्थलांतरित यापैकी एक पंजाबमधील सतपाल सिंगने आपबीती मांडताना अमेरिकेने खूप छळ केला असल्याचे सांगितले. हिंदुस्थानची काहीच इज्जत नाही, त्यांनी केवळ हिंदुस्थानी स्थलांतरितांनाच बेडय़ा घातल्या ना स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी दिली ना पुरेसे अन्न दिले, अशा नरकयातना त्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितल्या.

सतपाल सिंगने आपली जमीन विकून अमेरिका गाठली होती. यासाठी एजंटने त्याच्याकडून तब्बल 55 लाख रुपये घेतले. सतपाल म्हणाला की, एजंटने माझी फसवणूक केली आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पाठवले. अमेरिकेने हिंदुस्थानी स्थलांतरितांना बेडय़ा घातल्या, मात्र आमच्यासोबत तिथे असलेल्या स्पॅनिश महिलांच्या हातात बेडय़ा नव्हत्या. आम्हाला बेडय़ा घालून पनामामध्ये आणण्यात आले. तिथे 15 दिवस ठेवल्यानंतर कॅलिफोर्नियात पाच दिवस ठेवले. प्रचंड थंडी होती, कोणी आजारी असले तरी साध्या तापाचेही औषध दिले गेले नाही. एक-एक तासाने छळ सुरू होता. अतिशय वाईट वागणूक मिळाली.

बेरोजगारीमुळे देश सोडला

हिंदुस्थानातील बेरोजगारीच्या समस्येमुळे अमेरिकेत जावे लागले असल्याचे सतपाल सांगतो. आम्ही फिरोजपूर सीमेवर राहत असल्याने पावसाळ्यात पूर आला की गावात पाणी शिरते. बिकट परिस्थितीमुळे घर सोडावे लागले. फिरोजपूरमधील अनेक तरुण अमेरिकेत अडकले आहेत. काही जण मेक्सिकोमध्ये आहेत. बाहेर देशात जाण्यात काहीच फायदा नाही. इतर कोणत्याच देशात हिंदुस्थानींचे ऐकले जात नाही. हिंदुस्थानपेक्षा चांगला देश कुठलाच नाही. त्यामुळे कोणत्याच तरुणाने देश सोडून जाऊ नये, असे सतपाल सिंगने नमूद केले.