आज फायनलवर शिक्कामोर्तब, विजयाचा षटकार खेचण्यासाठी हिंदुस्थान सज्ज

साखळीत नॉनस्टॉप विजयाचा पंच मारणारा अपराजित हिंदुस्थान आता आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज झाला आहे. साखळीतही हिंदुस्थानने दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवला होता आणि उपांत्य सामन्यातही त्यांचा सहज फडशा पाडत विजयाचा षटकार खेचणार हेच जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

शनिवारी हिंदुस्थानने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही 2-1 ने पराभव करत आपल्या नॉनस्टॉप विजयाची मालिका कायम राखली होती. प्रत्येक क्षेत्रात जोरदार कामगिरी करत हिंदुस्थानी खेळाडूंनी आपले सातत्य कायम राखले आहे आणि तेच उर्वरित दोन्ही लढतीतही सर्वांना दिसेल, असा विश्वास हिंदुस्थानच्या कर्णधाराने बोलून दाखवलाय.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर आपल्या नावाची मोहोर उमटवणारा हिंदुस्थान चीनमध्ये सुवर्ण जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. हिंदुस्थान अपराजित असला तरी खेळात काहीही होऊ शकते आणि दक्षिण कोरियाला कमी लेखण्याची चूक हिंदुस्थानी संघ नक्कीच करणार नाही. या स्पर्धेत कोरियाला केवळ हिंदुस्थानच हरवू शकला आहे.

हिंदुस्थानने दक्षिण कोरियाविरुद्धचा साखळीतील सामना 3-1 असा सहज जिंकला होता. मात्र हा एक पराभव वगळता कोरियाने उर्वरित चारपैकी तीन लढती बरोबरीत सोडवल्या होत्या आणि त्यांनी आपला एकमेव विजय चीनविरुद्ध 3-2 असा मिळवला होता. म्हणजेच कोरिया वाटतो तेवढा कमकुवत संघ नक्कीच नाही.

हिंदुस्थानच भारी

हिंदुस्थान आणि दक्षिण कोरिया यांच्यात आतापर्यंत 61 सामने झाले असून त्यापैकी 38 सामन्यांत हिंदुस्थान, तर 11 सामन्यांत कोरिया विजयी ठरला आहे. याचाच अर्थ हिंदुस्थानचे पारडे जड आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी हिंदुस्थानने कोरियाची धुळधाण उडवली ती वेगळीच. सोमवारीसुद्धा कोरिया हिंदुस्थानचे आव्हान रोखण्यात यशस्वी ठरेल असे किंचितही वाटत नाही.

कोरियाला केवळ हिंदुस्थानच पराभूत करू शकला असला तरी तेसुद्धा चीन वगळता पुणाविरुद्धही विजय मिळवू न शकल्यामुळे हिंदुस्थानविरुद्ध ते काही अफलातून खेळ करतील अशी अपेक्षा नसली तरी ते काहीही करू शकतात इतका त्यांचा बेभरवशाचा खेळ आहे.

मैदानी गोलांचा पाऊस

हिंदुस्थानला गेल्या महिन्यात झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मैदानी गोल ठोकता येत नव्हते. मात्र चीनमध्ये हिंदुस्थानच्या कर्णधार हरमनप्रीत सिंहसह अराईजीत सिंह, राजपुमार पाल, सुखजीत सिंह, अभिषेक, उत्तम सिंह आणि गुरज्योत सिंह यांनी दमदार मैदानी गोल ठोकत आपली क्षमता दाखवली आहे. मैदानी गोल ठोकण्यात हिंदुस्थानी खेळाडू अव्वल ठरलेच आहेत पण बचावातही हिंदुस्थानी खेळाडू आघाडीवर आहेत.

हिंदुस्थानी रक्षणाला भेदण्यात पुणालाही यश लाभले नाही. त्यामुळे पाच सामन्यांत हिंदुस्थानविरुद्ध केवळ चारच गोल ठोकता आले आणि हिंदुस्थानने आरपार 21 गोल मारत आपली ताकद अवघ्या आशियाई संघांना दाखवलीय. 21 पैकी केवळ पाचच गोल पेनल्टीवर ठोकलेत हे विशेष. गोलरक्षक श्रीजेशच्या निवृत्तीनंतर कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा या दोघांनीही आपली कामगिरी चोख बजावत आम्हीच वारसदार असल्याचे आपल्या पहिल्याच मालिकेत दाखवून दिलेय.