हॉकी गोलरक्षक श्रीजेशची निवृत्तीची घोषणा, पॅरिस ऑलिम्पिक अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा

हिंदुस्थान हॉकी संघाचा स्टार गोलरक्षक आणि कर्णधार पी. आर. श्रीजेशने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. ‘पॅरिस ऑलिम्पिक हा माझा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असेल,’ असेही त्याने स्पष्ट केले. 2010मध्ये जागतिक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण करणाऱया 36 वर्षीय श्रीजेशचे हे कारकिर्दीतील चौथे ऑलिम्पिक होय.

पी. आर. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी हिंदुस्थानी संघ आठव्या स्थानी राहिला होता. मात्र, 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या हिंदुस्थानी संघाचा तो सदस्य होता. श्रीजेशने हिंदुस्थानसाठी आतापर्यंत 328 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याचबरोबर अनेक राष्ट्रकुल स्पर्धा व जागतिक स्पर्धांतही त्याने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे.