हिंदुस्थानी हॉकी संघाची घोषणा; यंदा ऑलिम्पिकमध्ये पदकाचा रंग बदलण्याचा निर्धार

आगामी महिन्यात होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर बुधवारी हिंदुस्थान हॉकी संघाची घोषणा झाली. या 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंहकडे सोपविण्यात आले असून, हार्दिक सिंहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदकाचा मानकरी ठरलेला हिंदुस्थानी संघ यावेळी पदकाचा रंग बदलण्याच्या निर्धाराने ऑलिम्पिकच्या स्वारीवर रवाना होणार आहे.

हॉकी इंडियाने जाहीर केलेल्या हिंदुस्थानी संघातील पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत. हिंदुस्थानी संघाच्या ‘क’ गटात गत चॅम्पियन बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड व आयर्लंड या संघांचा समावेश आहे. गुणतक्त्यातील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. हिंदुस्थानी हॉकीपटू सध्या बंगळुरूतील ‘साई’ पेंद्रामधील राष्ट्रीय शिबिरात ऑलिम्पिकची तयारी करत आहेत. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश व मधल्या फळीतील मनप्रीत सिंह चौथ्यांदा ऑलिम्पिक खेळणार असून कर्णधार हरमनप्रीतचा हे तिसरे ऑलिम्पिक असेल. जरमनप्रीत सिंह, संजय, राज कुमार पाल, अभिषेक व सुखजीत सिंह हे पाच नवे चेहरे यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करतील.

तब्बल 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदक जिंकून देणारे डिफेंडर रूपिंदरपाल सिंह व बीरेंद्र लाक्रा हे आता निवृत्त झाले आहेत, तर सुरेंदर कुमार संघातून बाहेर आहे. नीलकांत शर्मा व कृष्ण बहादूर पाठक यांना राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले असून दिलप्रीत सिंहला संधी मिळू शकली नाही. हिंदुस्थानी संघ 27 जुलैला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीने आपल्या ऑलिम्पिकच्या अभियानास प्रारंभ करणार आहे. हिंदुस्थानी हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात आठ सुवर्णांसह एक रौप्य व तीन कांस्य अशी एकूण 12 पदके जिंकलेली आहेत. ‘अ’ गटात नेदरलॅण्ड्स, जर्मनी, इंग्लंड, स्पेन, दक्षिण आफ्रिका व यजमान फ्रान्स या देशांचा समावेश आहे.

हिंदुस्थानी संघ गोलरक्षक पी. आर. श्रीजेश.

डिफेंडर जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह, सुमित, संजय. मिडफिल्डर राजकुमार पाल, शमशेर सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद. फॉरवर्ड अभिषेक, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंह, गुरजंत सिंह. राखीव खेळाडू नीलकांत शर्मा, जुगराज सिंह, कृष्ण बहादूर पाठक.

‘हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये अंतिम संघात स्थान मिळविण्यासाठी कमालीची चुरस आहे. निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूमध्ये ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे. कुठल्याही परिस्थितीत खेळण्याची मानसिकता या खेळाडूंमध्ये तयार झाली आहे. आम्ही पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज आहोत.’

व्रेग फुल्टन, हिंदुस्थानी हॉकी संघाचे प्रशिक्षक