बंगळुरु कसोटीचा हिरो सरफराज झाला ‘बाप’माणूस; पुत्ररत्नाचा लाभ, सोशल मीडियावर दिली गुड न्यूज

न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीमध्ये पहिले शतक झळकावणारा बॅटर सरफराज खान याच्या घरात पाळणा हलला आहे. सरफराजची पत्नी रोमाना जहूर हिने सोमवारी रात्री मुलाला जन्म दिला. सरफराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.

सरफराज खान आणि रोमाना जहूर यांचा 6 ऑगस्ट 2023 रोजी निकाल झाला होता. रोमाना जम्मू-कश्मीरमधील शोफिया जिल्ह्यातील पशपोरा गावची रहिवासी आहे. या दोघांची पहिली भेट दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर झाली होती. सरफराजच्या भावाने दोघांची भेट घडवून आणली होती. रोमाना दिल्लीत एमएससीची तयारी करत होती आणि सरफराजचा भाऊ तिच्याच वर्गात होता.

दरम्यान, बंगळुरू कसोटीमध्ये सरफराज खान याने दमदार फलंदाजी केली. एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या कसोटीत सरफराजने कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. हा सामना पाहण्यासाठी सरफराजची पत्नी रोमाना ही देखील बंगळुरुच्या मैदानावर उपस्थित होती.

पहिल्या डावात हिंदुस्थानी फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली होती. सरफराजही विशेष काही करू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात न्यूझीलंडची मोठी आघाडी मोडून काढण्यात त्याने मोलाचे योगदान देत 195 चेंडूत 150 धावा केल्या. मात्र इतर मधली फळी आणि तळाच्या फलंदाजांनी पाट्या टाकल्याने हिंदुस्थानला पराभव स्वीकारावा लागला.

सरफराज खान याने आतापर्यंतच्या आपल्या छोट्याशा कारकि‍र्दीत आपली छाप उमटवली आहे. त्याने 4 कसोटीत 7 डावात फलंदाजी करताना 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 350 धावा केल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. 52 लढतीत 16 शतक आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 4572 धावा चोपल्या असून नाबाद 301 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.