गुजरातमध्ये 1800 कोटी रुपयांचे 300 किलो ड्रग्ज जप्त, ATS आणि तटरक्षक दलाला मोठं यश

गुजरात एटीएस आणि हिंदुस्थानी तटरक्षक दलाला बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीविरुद्ध मोठे यश मिळालं आहे. संयुक्त कारवाईअंतर्गत दोघांनीही 300 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. ज्याची किंमत 1800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अरबी समुद्रमार्गे ड्रग्ज तस्कर ते हिंदुस्थानात आणत होते. ही कारवाई12 आणि 13 एप्रिलच्या रात्री करण्यात आली आहे, अशी माहिती तटरक्षक दलाने दिली आहे.

तटरक्षक दलाने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, “तटरक्षक दलाने (ICG) गुजरात एटीएससोबत संयुक्त कारवाईत 12 आणि 13 एप्रिलच्या रात्री गुजरात किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा सीमेवर (IMBL) 1800 कोटी रुपयांचे 300 किलो ड्रग्ज जप्त केले. तटरक्षक दलाचे जहाज पाहताच तस्करांनी ड्रग्ज समुद्रात फेकून दिलं आणि आयएमबीएल ओलांडून पळून गेले. तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी समुद्रातून ड्रग्जचा माल जप्त केला आणि पुढील तपासासाठी गुजरात एटीएसकडे सोपवला.”