हरमनप्रीतची मान दुखावली, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिट होण्याची शक्यता

हिंदुस्थानला सन्मानजनक विजय मिळवून देताना कर्णधार हरमनप्रीत कौरने 24 चेंडूंत 19 धावांची खेळी केली, पण हिंदुस्थानी संघ विजयापासून केवळ 2 धावा दूर असताना पाकिस्तानी गोलंदाज निदा दारला फटका मारण्याच्या प्रयत्नात तिने आपले संतुलन गमावले आणि ती क्रीझवर पडली. यात तिची मान काहीशी दुखावली. त्यामुळे तिला संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याआधीच मैदान सोडावे लागले. तिच्या मानेची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे. त्यामुळे ती येत्या 9 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी पुन्हा मैदानात दिसेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संतुलन गमावल्यानंतर हरमनप्रीत मैदानात पडली आणि तिची मान दुखावली तेव्हा हिंदुस्थानी संघाची धडधड वाढली होती. कारण हरमनप्रीतची दुखापत गंभीर असेल तर तिला विश्रांती दिल्यास संघाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच सलामीचा सामना गमावल्यामुळे हिंदुस्थानसाठी आता प्रत्येक सामना करो किंवा मरो असल्यामुळे विजयाशिवाय पर्याय उरलेलाच नाही. कर्णधाराच्या मानेबद्दल संघव्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून सध्या तिच्या दुखापतीची तपासणी केली जात आहे.

हिंदुस्थानी संघाचा मान राखण्यासाठी कर्णधाराला आपल्या मानेच्या दुखण्यातून पूर्णपणे बरे होऊन बुधवारी मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे हरमनप्रीतची दुखापत सामान्य असावी आणि तिने संघाचे जोरदार नेतृत्व करावे, अशी सामान्य क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. ती इच्छा हरमनप्रीत पूर्ण करील, असा विश्वासही आहे.