अमित पंघाल व जैस्मिन लॅबोरिया या हिंदुस्थानी बॉक्सर्सनी दुसऱया जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत रविवारी पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. आतापर्यंत सहावा हिंदुस्थानी बॉक्सर्सनी ऑलिम्पिकचा कोटा मिळविलाय हे विशेष.
पुरुषांच्या 51 किलो गटातील उपांत्यपूर्व लढतीत अमित पंघालने चीनच्या लियू चुआंगचा 5-0 गुणफरकाने धुव्वा उडवित ऑलिम्पिकचा कोटा मिळविला. जैस्मिनने महिलांच्या 57 किलो गटात मालीच्या मरिन पॅमारा हिचा 5-0 गुणफरकाने पराभव करीत ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. अमित पंघाल पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविणारा दुसरा हिंदुस्थानी पुरुष बॉक्सर ठरला. याआधी निशांत देवने 71 किलो गटात मालदोवाच्या वॅसिल पॅबोटरीचा 5-0 गुण फरकाने पराभव करीत ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले होते. अमित पंघालने बर्मिंगहॅममध्ये (इंग्लंड) झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
अमित पंघालने टोकियो ऑलिम्पिकमध्येही 52 किलो गटात हिंदुस्थानने प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानीही होता, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंघालचा सलामीलाच पराभव झाला. त्याला रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या युबरजेन मार्टिनेजने 4-1 फरकाने हरविले होते.
झरीन, प्रीती, लवलीनाही पात्र
निकहत झरीन (50 किलो), प्रीती पवार (54 किलो) व टोकियो ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेती लवलीना बोरगोहिन (75 किलो) या हिंदुस्थानी महिला बॉक्सरही पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. या सर्वांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतच पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले होते.