
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याने पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सुरक्षेसाठी भामरागड तालुक्यातील कियार-आलापल्लीदरम्यान रोड ओपनिंग करताना बुधवारी विशेष कृती दलातील (सॅग) रवीश मधुमटके (34) या पोलीस अंमलदाराला हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ते जिल्हा पोलीस दलातील विशेष कृती दलात सक्रिय होते. गेल्या तीन दिवसांत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील दिरंगी व फुलनार जंगलात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महेश नागुलवार या जवानास वीरमरण आले.