जम्मू- कश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील संवेदनशील असलेल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) बुधवारी पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी 15 राउंड गोळीबार केला. त्यानंतर हिंदुस्थांनी लष्काराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांना दुखापत झाली नाही. मात्र, याघटनेमुळे एलओसीवरील तणाव वाढला आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला आणि चिथावणीला हिंदुस्थानने योग्य उत्तर दिले आहे. हिंदुस्थानने प्रत्यत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचा डाव उलथवण्यात यश आले आहे. पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यासाठी अनेकदा असा गोळीबार करण्यात येतो. मात्र, हिंदुस्थानी जवान सतर्क असल्याने पाकिस्तानचा डाव उलथवला गेला आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनेनंतर सैन्याने पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळील परिसरात शोध मोहीम सुरू केली. लष्कराचे जवान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून, या प्रदेशात अधिक दक्षता राखत आहे.