हिंदुस्थानचे लष्कर पॉवरफुल यादीत, ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये मिळाले स्थान

जगातील शक्तिशाली लष्कर असणाऱया देशांची यादी जाहीर झालीय. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये (जीएफआय) मध्ये म्हणजेच जगातील शक्तिशाली लष्कर असणाऱया देशांच्या यादीत हिंदुस्थान चौथ्या स्थानावर आहे. जीएफआयमध्ये हिंदुस्थानला एक महत्त्वपूर्ण लष्करी ताकद म्हणून दर्शवण्यात आलंय. या यादीत सुपरपॉवर अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रशिया आणि चीनचा नंबर आहे. ‘ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स’नुसार 0.1184 स्कोरसह हिंदुस्थान चौथ्या स्थानावर आहे. टॉप 5 मध्ये जागा बनवत दक्षिण कोरिया पाचव्या स्थानी पोचला आहे. अण्वस्त्रांचा दावा करणारे पाकिस्तान टॉप 10 मध्येही नाही. जीएफआय इंडेक्समध्ये पाकिस्तानला 12 वे स्थान दिलंय. हिंदुस्थानची हवाई आणि नौदल ताकद पाहता पाकिस्तान खूपच मागे आहे. वायुदलाच्या ताकदीत हिंदुस्थानला जीएफआय रँकिंगमध्ये चौथे स्थान देण्यात आलंय, तर नौदलाच्या ताकदीत सहावे स्थान मिळालंय. जीएफआयच्या रँकिंगनुसार, हिंदुस्थानकडे 51.37 लाख सैनिक आहेत. त्यामध्ये 14.55 लाख सक्रीय सैनिक आहेत,तर 11.55 लाख राखीव सैनिक आहेत. 25.27 लाख निमलष्करी दलाचे जवान आहेत.

– ‘ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स’ मध्ये एकूण 145 राष्ट्रांच्या लष्करी ताकदीचा आढावा घेण्यात आला. यादीत अमेरिकेने 2005 पासून आपले स्थान आजतागायत पहिल्या स्थानी कायम ठेवले आहे.

– तर काही राष्ट्रांची लष्करी ताकदीत नव्याने झेप घेतली आहे. 5 व्या स्थानी दक्षिण कोरिया, 7 व्या जपान, तुर्की 8 व्या तर इराण 14 व्या स्थानी पोचला आहे. यामागे डिफेन्स बजेट, व्यूहरचनात्मक भागीदारी असा अनेक बाबी आहेत.