
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील बर्फाळ प्रदेशात सुरू असलेल्या कारवाईत लष्कराने दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. आज गोळीबारात मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या संघटनेशी संबंधित होते. ठार झालेल्यांमध्ये एक टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश होता. तो गेल्या एक वर्षापासून चिनाब खोऱयात सक्रिय होता. खराब आणि प्रतिकूल हवामान असतानाही दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असून आज दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असे लष्कराने म्हटले.
लष्कराने घटनास्थळावरून एक एके आणि एक एम4 रायफलसह मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री जप्त केली. तसेच उधमपूर जिह्यातील बसंतगढ आणि रामनगर भागात बुधवारपासून इतर तीन दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन सुरू आहे.
एलओसीजवळ हिंदुस्थानी जवान शहीद
अखनूर सेक्टरमध्ये एलओसीजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्करातील कनिष्ठ आयोग अधिकाऱ्याला (जेसीओ) वीरमरण आले. मात्र, सीमेपलीकडून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला, असे अधिकाऱयांनी सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा केरी भट्टल भागात झालेल्या चकमकीनंतर दहशतवाद्यांनी पाकव्याप्त कश्मीरमध्ये (पीओके) आसरा घेतला असल्याचा अंदाज आहे. सुभेदार कुलदीप चंद हे चकमकीत जखमी झाले आणि नंतर शहीद झाले.