सुनिताने अंतराळात घेतली पत्रकार परिषद; हितचिंतकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी त्यांचे सहकारी बच विल्मोर यांच्यासह अंतराळात झेप घेतली. मात्र त्यांच्या यानात बिघाड झाल्यामुळे सुनिता आणि बच विल्मोर यांना पृथ्वीवर परतण्यास अडचणी येत आहेत. तरी लवकरच यानातील तांत्रिक अडचणी सोडवून दोघे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील, असे नासाच्या टीमने सांगितले आहे. दरम्यान, सुनिता आणि बच विल्मोर यांनी आता पत्रकार परिषद घेऊन सर्वांची चिंता दूर केली आहे.

बरेच दिवस अंतराळात अडकल्यानंतर सुनिता आणि बच विल्मोरने पहिल्यांदा एक पत्रकार परिषद घेतली आहे. आम्हाला संपूर्ण खात्री आहे आमचे बोईंग स्टारलाइनर यान आम्हाला सुखरूप घरी आणेल. आमचे हे मिशन अपयशी होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच आम्ही थांबलो आहोत. नासा आणि बोईंग यांच्या पृथ्वीवरील थ्रस्टर चाचण्यांचा सुरू असलेला तपास परतण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

NASA अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे 5 जून रोजी फ्लोरिडा येथून अंतराळात झेप घेतली. 6 जूनपासून सुनिता विल्यम्स आणि बच विल्मोर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे आहेत. ते 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. परंतु स्टारलाइनरमधील त्रुटीमुळे त्यांचे मिशन अनिश्चित काळासाठी वाढले आहे. सध्या या यानातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे .

हिंदुस्थानी वंशाच्या सुनिता विल्यम्सला पत्रकार परिषदेत पाहून तिच्या हितचिंतकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अंतराळविरांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे नासाने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र त्यांची परतण्याची वेळ त्यांनी अजून सांगितलेली नाही. याशिवाय सुनिताने अंतराळात अनेक आश्चर्यकारक दृश्ये पाहिली आहेत, हे अनुभव तिने पत्रकार परिषदेत सांगितले.