
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने हवाई दलाने गुरुवारी ‘आक्रमण’ युद्धसराव देखील सुरू केला. यावेळी राफेल जेट्सच्या नेतृत्वाखालील लढाऊ ताफ्याचे शक्तिशाली प्रदर्शन करण्यात आले. हवाई दल हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे तैनात असलेली दोन राफेल स्क्वॉड्रन चालवते. ही अत्याधुनिक विमाने युद्धसरावाच्या केंद्रस्थानी आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीन वाढला आहे. पाकिस्तानने निरापराधी लोकांचा बळी घेतल्याने हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थान सर्व ताकदीनिशी सज्ज झाला आहे. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा निर्धार करीत हवाई दलाने गुरुवारी ‘आक्रमण’ युद्धसराव सुरु केला. हवाई दलाच्या वैमानिकांनी टेकडी आणि जमिनीवरील टार्गेटवर निशाणा साधून अचूक हल्ला करण्याचा सराव केला.
उच्च तीव्रतेच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यास हवाई दलाचे वैमानिक कुठलीही हार न मानता शत्रूचे मनसुबे उधळून लावतील हे उद्दिष्ट ठेवून युद्धसराव सुरु ठेवण्यात आला आहे. पूर्व सेक्टरमधून मध्य सेक्टरमध्ये अनेक हवाई दलाची उपकरणे पाठवण्यात आली आहेत. तेथून लांब अंतरावरून शत्रूच्या ठिकाणांवर अचूक बॉम्बफेक केली जात आहे, अशी माहिती संरक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. याआधी हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार संपुष्टात आणला आहे. या माध्यमातून पाकिस्तानला कठोर संदेश देण्यात आला आहे.