जगज्जेत्यांच्या जंगी स्वागताची मुंबईकरांना उत्सुकता, मिरवणुकीच्या शहराबाबत बीसीसीआयकडून गोपनीयता

देहू-आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या वारकरी भक्तांना जशी विठूरायाच्या दर्शनाची आतुरता लागलेली असते, अगदी त्याप्रमाणेच क्रिकेटवेडय़ा वारकऱयांचीही जगज्जेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठीची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. बार्बाडोसमध्ये टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरणारी रोहित शर्माची सेना तिकडे चक्रीवादळामुळे हॉटेलमध्येच अडकली आहे. या चक्रीवादळामुळे बार्बाडोसचा विमानतळ बंद करण्यात आल्याने टीम इंडियाला मायदेशी परतण्यास विलंब होत आहे. जगज्जेता हिंदुस्थानी संघ मायदेशी परतल्यानंतर या विजयी वीरांच्या जंगी स्वागताबाबत मुंबईकरांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. मात्र बीसीसीआयने स्थळच जाहीर न केल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. बीसीसीआयने मिरवणुकीबाबत गोपनीयता बाळगल्यामुळे ती मुंबई, दिल्ली की अहमदाबाद यापैकी कुठे होणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

नवख्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नव्या दमाच्या टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवून 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या हिंदुस्थानी खेळाडूंची मुंबईमध्ये उघडय़ा बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. ‘बीसीसीआय’चे मुख्यालय मुंबईत असल्याने यावेळीही जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाचे स्वागत मुंबईत व्हायला हवे. मात्र, ज्याप्रमाणे मायदेशात झालेल्या वन डे वर्ल्ड कपची फायनल मुंबईऐवजी अहमदाबादला हलविण्यात आली, त्याप्रमाणेच टीम इंडियाच्या विजयी वीरांच्या स्वागताची तयारीही अहमदाबादमध्येच तर सुरू नाही ना अशा चर्चांना आता उधाण आले आहे. याचबरोबर टीम इंडिया थेट राजधानी दिल्लीत आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्याचीही तयारी कदाचित सुरू असेल. त्याचबरोबर जगज्जेत्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात असून बीसीसीआयने याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली असावी, अशीही शक्यता क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

चार्टर्ड प्लेनने थेट दिल्लीत येणार?

‘बीसीसीआय’च्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगज्जेता हिंदुस्थानी संघ ब्रिजटाऊनहून न्यूयॉर्क व तेथून दुबईमार्गे मायदेशात दाखल होणार होता. मात्र, अटलांटिक महासागरातील बेरिल चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये सध्या 210 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमानतळही एका दिवसासाठी बंद करावा लागला. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघाला आता चार्टर्ड प्लेनने थेट दिल्लीत आणण्याचे नियोजन होऊ शकते. दिल्लीत आल्यानंतर अर्थातच पंतप्रधानांच्या भेटीचाही विचार होऊ शकतो. हिंदुस्थानी संघातील खेळाडूंसह सपार्ंटग स्टाफ, कुटुंबीय व अधिकारी असे जवळपास 70 सदस्य विंडीजहून मायदेशी परतणार आहेत.

2011 साली मिरवणूक नव्हती…

हिंदुस्थानने 2011 साली आयसीसी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयने कोणतीही मिरवणूक काढली नव्हती. ती स्पर्धा मायदेशातच खेळली गेली होती आणि 2 एप्रिलची मध्यरात्र अवघा हिंदुस्थान जगज्जेतेपदाचा जल्लोष साजरा करत होता. त्यावेळीही बीसीसीआयकडून मिरवणुकीची अपेक्षा होती, पण त्यांनी कोणतीही मिरवणूक काढली नव्हती. मात्र 1983 चे विश्वविजेतेपद इंग्लंडमध्ये, 2007 चे जगज्जेतेपद दक्षिण आफ्रिकेत जिंकले होते. या दोन्ही स्पर्धा परदेशात जिंकल्या होत्या, म्हणून त्याची मिरवणूक काढली गेली होती. त्यामुळे आताही मिरवणूक काढली जाण्याची दाट शक्यता आहे.

‘चक्रीवादळामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघासह आम्ही सर्व बार्बाडोसमध्येच अडकून पडलोय. त्यामुळे मायदेशी परतण्याचे वेळापत्रक अद्याप स्पष्ट नाही. प्रवासाचे नियोजन झाले की जगज्जेत्या खेळाडूंच्या गौरव सोहळय़ाबद्दलची माहिती दिली जाईल.’
 जय शहा, बीसीसीआयचे सचिव