पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविल्यानंतर डरकाळ्या फोडत हिंदुस्थानच्या स्वारीवर आलेल्या बांगला वाघांची रोहित शर्माच्या सेनेने अवघ्या साडेतीन दिवसांतच शिकार केली. पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा 280 धावांनी धुक्वा उडवित यजमान हिंदुस्थानने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात संकटमोचक ठरलेल्या रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा यांची अष्टपैलू चमक आणि ऋषभ पंत व शुबमन गिल यांनी दुसऱ्या डावात ठोकलेली शतके ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 6 विकेट टिपणारा अश्विन या विजयाचा महानायक ठरला.
अश्विनला 6, तर जाडेजाला 5 विकेट
पहिल्या डावात एकही विकेट न मिळालेल्या रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात 6 विकेट टिपले. त्याने तिसऱ्या दिवशी 3, तर चौथ्या दिवशी 3 फलंदाज बाद केले. रवींद्र जाडेजाला या कसोटीत 5 विकेट मिळाल्या. त्याने पहिल्या डावात 2, तर दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. याचबरोबर एकाच कसोटीत शतक आणि पाच विकेट टिपण्याचा पराक्रम अश्विनने केला. याआधी जाडेजाने हा पराक्रम दोन वेळा केलेला आहे.
हॅडली, वॉल्शचा विक्रम मोडला अन् वॉर्नला गाठले
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच विकेट टिपण्याची रविचंद्रन अश्विनची ही 37 वी वेळ होय. त्याने एका डावात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला. याचबरोबर त्याने याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नचीही बरोबरी केली. या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन अक्वल स्थानावर असून, त्याने 67 वेळा एका डावात 5 विकेट टिपण्याचा विक्रम केलेला आहे. शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट टिपणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आठव्या स्थानी आला आहे. त्याने 101 कसोटी सामन्यांत 522 फलंदाज बाद केले आहेत. याबाबतीत त्याने वेस्ट इंडीजच्या कर्टनी वॉल्शचा 519 विकेटचा विक्रम मागे टाकला.
अश्विनची द्रविड-कुंबळेशी बरोबरी
हिंदुस्थानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 14 सामनावीराचे पुरस्कार सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. रविचंद्रन अश्विनला बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दहावा सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने याबाबतीत राहुल द्रविड, रवींद्र जाडेजा, विराट कोहली व अनिल कुंबळे यांची बरोबरी केली. द्रविड आणि कुंबळे निवृत्त झालेले असल्याने आणखी एक सामनावीराचा किताब मिळाल्यास अश्विनसह जाडेजा व कोहली यांना द्रविड-कुंबळे यांना पिछाडीवर टाकण्याची संधी असेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा दावा मजबूत
बांगलादेशला पहिल्या कसोटीत 280 धावांनी धूळ चारून टीम इंडियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. कारण या विजयानंतर हिंदुस्थानी संघाचे 86 रेटिंग गुण झाले आहेत. 71.67 च्या विजयी टक्केवारीसह टीम इंडिया अक्वल स्थानावर आहे. आयसीसीच्या अहवालानुसार हिंदुस्थानला आता पुढील नऊपैकी किमान सहा सामने जिंकावे लागतील. यामध्ये हिंदुस्थान बांगलादेशविरुद्ध एक आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे. याचबरोबर पाच सामने परदेशात म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. हिंदुस्थानने पाच सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.
आता पराभवापेक्षा विजय अधिक
हिंदुस्थानसाठी 92 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या कारकीर्दीत आजचा बांगलादेशविरुद्धचा विजय ऐतिहासिक ठरला. 25 जून 1932 साली हिंदुस्थानने पहिली कसोटी खेळली होती. त्यानंतर या संघाला पहिल्या विजयासाठी तब्बल 20 वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. 1952 मध्ये हिंदुस्थानने इंग्लंडला हरवून पहिला कसोटी विजय मिळविला होता. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर हिंदुस्थानच्या जय-पराजयाचे पारडे 179-178 असे झाले. म्हणजेच आता हिंदुस्थानच्या पराभवांपेक्षा विजयांची संख्या अधिक झाली आहे हे विशेष!
उपाहारापूर्वीच बांगलादेशचा खेळ खल्लास!
हिंदुस्थानने 376 धावसंख्या उभारल्यानंतर बांगलादेशला 149 धावांवर गुंडाळत पहिल्या डावात 227 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर हिंदुस्थानने 4 बाद 287 धावांवर दुसरा डाव घोषित करून बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे कठीण आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल पाहुण्या संघाने तिसऱ्या दिवसाच्या 4 बाद 158 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार नजमुल हसन शांतोने 51, तर शाकिब अल हसनने 5 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दोघांमध्ये 48 धावांची भागीदारी झालेली असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने लोकल बॉय रविचंद्रन अश्विनकडे चेंडू सोपविला. त्याने पहिल्याच षटकात शाकिबला (25 धावा) जैसवालकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला पाचवे यश मिळवून दिले. 5 बाद 194 अशा स्थितीत बांगलादेशने आणखी 40 धावा जमविता उर्वरित पाच फलंदाज गमाविले. त्यांचा दुसरा डाव 62.1 षटकांत 234 धावांवर संकुष्टात आला. शांते 82 धावांवर बाद झाला. अश्विन-जाडेजा जोडीने उपाहारापूर्वीच बांगलादेशचा खेळ खल्लास करीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.