IND vs SL – श्रीलंकेविरुद्ध हिंदुस्थानी महिला संघ काळी पट्टी बांधून उतरला मैदानात, कारण काय?

देशात इंडियन प्रीमियर लीगची धूम सुरू असताना दुसरीकडे हिंदुस्थानचा महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघात तिरंगी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील हिंदुस्थानचा पहिला श्रीलंकेशी होत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या लढतीत हिंदुस्थानचा महिला संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला असून सर्वच स्तरातून निषेधाचे सूर उमटत आहेत. क्रिकेटच्या मैदानातही याचे पडसाद उमटले. हा हल्ला झाल्यानंतर आयपीएलच्या लढतीतही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली नव्हती. तसेच चिअर लिडर्सही नाचवण्यात आल्या नव्हत्या. आता हिंदुस्थानचा महिला संघही दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

दरम्यान, हिंदुस्थान आणि श्रीलंका लढतीत पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना 39-39 षटकांचा करण्यात आला. हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानकडून काशवी गौतम आणि नल्लापुरेड्डी चरणी हिला पदार्पणाची संधी मिळाली आहे.