ज्युदोपटू कपिल परमारने पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेच्या जे 1 श्रेणीत ब्राझीलच्या एलिल्टन डे ओलिविएराचा 10-0 ने धुव्वा उडवला आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानच्या पदकांचा रौप्य महोत्सव साजरा केला. तसेच हिंदुस्थानने पॅरालिम्पिक स्पर्धेतील आपल्या पदकांचा सुवर्ण महोत्सवही साजरा केला. विशेष म्हणजे गेल्या दोन ऑलिम्पिकमध्येच हिंदुस्थानी खेळाडूंनी 44 पदके जिंकली आहेत.
हिंदुस्थानने अपेक्षेप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासह रौप्य महोत्सवही साजरा केला. कपिल परमारला उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी होती, पण इराणच्या बनिताबा खोर्रमविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.
त्याआधी उपांत्यपूर्व सामन्यात त्याने व्हेनेझुएलाच्या मार्कोस डेनिस ब्लँकोचा 10-0 ने फडशा पाडला होता, मात्र तो कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात सरस ठरला. दुसरीकडे महिलांच्या 48 किलो वजनी गटात जे 2 श्रेणीत उपांत्यपूर्व सामन्यात हिंदुस्थानच्या कोकिलावर कझाकस्तानच्या अकमारल नोटबॅककडून 0-10 अशी दारुण हार पत्करावी लागली होती.
धरमबीरची सुवर्ण फेक
बुधवारी उशिरा पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेच्या टी 54 श्रेणीत हिंदुस्थानच्या धरमबीरने आपल्या चार अपयशी प्रयत्नांनंतर 34.92 मीटर फेक करत आपला सुवर्ण पदकावर दावा केला होता. तसेच याच गटात प्रणव सूरमाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 34.59 मीटर फेक करत या फेरीत आघाडी घेतली होती, पण त्याची आघाडी धरमबीरने मागे टाकली आणि सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली. सूरमाने आपल्या सहापैकी पाच प्रयत्नांत 33 मीटरपेक्षा दूर फेक केली होती. या गटात सर्बियाचा झेलको दिमित्रीजेविक तिसरा आला. धरमबीरच्या सुवर्णामुळे हिंदुस्थानने सर्वाधिक 5 सुवर्ण पदकांच्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेची बरोबरी साधली.
धरमबीरचे सुवर्ण प्रशिक्षकांना अर्पण
धरमबीरने 34.92 मीटर फेक करत आशियाई विक्रम मोडत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. त्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून आपले सुवर्ण पदक आपला सहकारी आणि प्रशिक्षक अमित कुमार सरोहाला अर्पण केले. आपण मिळवलेले यश आपली भावी पिढी आणखी पुढे घेऊन जाईल, ही भावनाही त्याने व्यक्त केली. मात्र धरमबीरचा गुरू अमित याच फेरीत दहावा आला.
अमितला आपल्या शिष्याच्या आसपासही पोहोचता आले नाही. तो फक्त 23.96 मीटर फेक करू शकला. या कामगिरीने अमित निराश झाला होता, पण त्याचबरोबर त्याचा शिष्य असलेल्या धरमबीरची कामगिरी पाहून त्याचे डोळे पाणावले. या सुवर्ण फेकीनंतर धरमबीर म्हणाला, हे पदक जिंकणे माझे स्वप्न होते आणि ते स्वप्न साकारही झाले. माझ्या यशात सर्वात मोठा वाटा माझा गुरू-सहकारी अमितचाच होता. आम्ही जेव्हा अमितची माहिती जाणून घेऊ तेव्हा भावी पिढीसुद्धा या खेळात आपसूकच खेचली जाईल, असेही धरमबीर म्हणाला.