हिंदुस्थानी पॅरापटूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक पराक्रम करताना नवा इतिहास रचला. त्यांनी स्पर्धेत 7 सुवर्णांसह 9 रौप्य व 13 कांस्य अशी एकूण 29 पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदुस्थानी पथकाने टोकियो ऑलिम्पिकमधील जिंकलेल्या आपल्या 19 पदकांचा विक्रम मोडीत काढला.
25 पदकांचे लक्ष्य पार
यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत 25 पदकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत हिंदुस्थानी संघ पॅरिसच्या स्वारीवर गेला होता. अवनी लेखराच्या सुवर्णपदकाने सुरू झालेला हिंदुस्थानी पथकाचा प्रवास नवदीप सिंहच्या सुवर्णपदकाने समाप्त झाला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 84 पॅरा ऍथलिट्सचे पथक सहभागी झाले होते. याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा हिंदुस्थानसाठी सर्वात यशस्वी ठरली होती. त्यावेळी 54 खेळाडूंच्या हिंदुस्थानी पथकाने 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य अशी एकूण 19 पदके जिंकली होती, मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी पथकाने गतवेळपेक्षा सरस कामगिरी करून नवा इतिहास घडविला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकतक्त्यात 24 व्या स्थानी राहिलेल्या हिंदुस्थानने यावेळी 19 व्या स्थानी झेप घेतली. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील हिंदुस्थानची ही सर्वोच्च क्रमवारी होय, हे विशेष.
पॅरिस पॅरालिम्पिकमधील पदक विजेते हिंदुस्थानी खेळाडू
नेमबाजी ः सुवर्ण ः अवनी लेखरा. रौप्य ः मनीष नरवाल. कांस्य ः मोना अग्रवाल, रुबिना फ्रान्सिस.
ऍथलेटिक्स ः सुवर्ण ः सुमित अंतिल, धरमबीर, प्रवीण कुमार, नवदीप सिंग. रौप्य ः निषाद कुमार, योगेश कथुनिया, अजित सिंह, शरद कुमार, सचिन खिलारी, प्रणव सुरमा, कांस्य ः प्रीती पाल, दीप्ती जीवनजी, सुंदर सिंह गुर्जर, मरियप्पन थंगावेलु, होकाटा सेमा, सिमरन शर्मा.
बॅडमिंटन ः सुवर्ण ः नितेश कुमार. रौप्य ः तुलसीमती मुरुगेसन, सुहास एलवाई. कांस्य ः मनीषा रामदास, नित्या श्री सिवान. तिरंदाजी ः सुवर्ण ः हरविंदर सिंह. कांस्य ः राकेश कुमार/शीतल देवी. ज्युदो ः कांस्य ः कपिल परमार.
दोन स्पर्धांत कामगिरी उंचावली
पॅरालिम्पिकच्या मागील दोन स्पर्धांमध्ये हिंदुस्थानने एकूण 48 पदके जिंकली आहेत. त्याआधीच्या 11 पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानने केवळ 12 पदके जिंकली होती, मात्र गेल्या दोन स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंची कामगिरी कमालीची उंचावली असल्याने स्पष्टपणे दिसून येत आहे. टोकियो पॅरालिम्पिकपूर्वी हिंदुस्थानने केवळ 4 सुवर्णपदके जिंकली होती. आता फक्त पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानने 7 सुवर्ण जिंकले आहेत. तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये हिंदुस्थानने 5 सुवर्णपदके जिंकली होती.
पदके जास्त, पण सरासरी सारखी
टोकियो पॅरालिम्पिकच्या तुलनेत हिंदुस्थानने पॅरिसमध्ये 10 पदके जास्त जिंकल्यामुळे साऱ्यांनाच पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मोठे यश मिळवल्याचा भास होत असेल. पण दोन्ही स्पर्धांची सरासरी पाहाता हे यश जवळजवळ सारखेच आहे. टोकियोत 54 पॅरा ऍथलीट गेले होते आणि त्यांनी 19 पदके जिंकली होती. म्हणजे 3 खेळाडूंमागे एका खेळाडूला पदक जिंकता आले होते आणि यावेळी 84 खेळाडूंनी 29 पदकांचा आकडा गाठता आला आहे. एकूण काय तर पॅरिसमध्येही खेळाडूंना त्याच सरासरीने यश मिळाले आहे. दोन्ही स्पर्धांची यशाची टक्केवारी जवळजवळ सारखीच असल्यामुळे टोकियो स्पर्धेच्या तुलनेत पॅरिसचे यश फार मोठे आहे, असा समज चुकीचा आहे.