
‘जशास तसे’ धोरणाप्रमाणे टेरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. आता त्यांचे टेरिफ 2 एप्रिलपासून लागू होत असल्याने या टेरिफ वॉरमध्ये हिंदुस्थानही भरडला जाणार आहे. टेरिफमधून सूट देण्याचे कोणतेही संकेत अमेरिकेकडून मिळत नसल्याने हिंदुस्थानवरील टेरिफचे संकट अधिकच गडद झाले आहे. याचा परिणाम अनेक उद्योगांवर होणार असून याचा मोठा फटका शेअर बाजारालाही बसण्याची शक्यता आहे.
टेरिफबाबत मार्ग काढण्यासाठी हिंदुस्थानसोबत चर्चा सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, हिंदुस्थानला टेरिफमध्ये सूट मिळण्याचे कोणतेही संकेत अमेरिकेकडून अद्याप मिळत नाहीत. त्यामुळे हे संकट अधिक गडद झाले आहे. हिंदुस्थान- अमरिकेत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी उत्पादनांवरही अमेरिका प्रंचड टेरिफ लादण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये या परस्पर कराची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी कॅनडा, मॅक्सिको आणि हिंदुस्थानचे नाव घेतले होते. तसेच 2 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे आता हिंदुस्थानला अमेरिकेच्या टेरिफ वॉरला तोंड द्यावे लागणार आहे. दोन्ही देशांनी काही विशिष्ट क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा केली. अमेरिकेच्या शुल्कामुळे पुढील आर्थिक वर्षात भारताची निर्यात 7.3 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी होऊ शकते, असा अंदाज क्रेडिट रेटिंग एजन्सीने व्यक्त केला आहे.