हिंदुस्थानने ‘डब्ल्यूएचओ’कडे मागितले ‘मोटान्युमो’ अपडेट, देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज, घाबरू नका! नव्या व्हायरसबाबत केंद्राकडून सतर्कता

पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना व्हायरस आल्यानंतर अवघ्या जगाला हादरवल्यानंतर आता पुन्हा चीनमध्येच कोरोनासारख्याच मोटान्यूमो व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे हिंदुस्थानने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरकडे मोटान्युमो व्हायरचा प्रसार, तीव्रता आणि घ्यावयाच्या खबरदारीबाबत तातडीने अपडेट मागवले आहेत. मात्र याच वेळी या आजारामुळे देशातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून अशा प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व प्रकारची आरोग्य यंत्रणा सज्ज आणि सक्षम असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी आज दिली.

चीनमध्ये सध्या मोटान्युमो विषाणूने प्रचंड थैमान घातले असून झपाटय़ाने संसर्ग वाढत आहे. विषाणूच्या संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो झाली आहेत. विषाणूच्या संसर्गामुळे प्रचंड हाहाकार उडाला असून मृतदेहांचा खच पडत आहे. त्यामुळे चीनमध्ये सध्या अक्षरशः आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली असून थरकाप उडवणाऱया किंकाळ्या आणि आक्रोशामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्येही आरोग्य मंत्रालय सतर्क झाले असून एन्फ्युएन्झासदृश रुग्णांबाबत सर्व प्रकरणांचा सखोल अभ्यास केला जात आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली. या आजाराची लक्षणे कोरोनासदृशच असली तरी सद्यस्थितीत हिवाळा असतानाही देशात तापासारखी लक्षणे असलेल्या आजाराचा प्रसार झाल्याचेही ‘आयसीएमआर’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र म्हणते आजार गंभीर नाही

चीनमधील मोटान्युमो प्रसाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, मोटान्युमो आजार श्वसनाशी संबंधित आजार असून सर्दी-तापासारखी लक्षणे दाखवतो. यामध्ये वयोवृद्ध आणि लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. मात्र हा गंभीर आजार नसल्याने जास्त काळजी करण्याची गरज नाही. हिवाळ्याच्या दिवसांत श्वसनासंबंधित आजार होणे सहज गोष्ट आहे.

अशी आहे तयारी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नोंदीनुसार सर्दी-तापासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या सध्या प्रमाणाबाहेर वाढलेली नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. देशात अशा प्रकारच्या कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे. बेड आणि ऑक्सिजन सिलिंडर यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात असल्याची माहितीही डॉ. गोयल यांनी दिली.