हिंदुस्थानी महिलांची विजयाची हॅटट्रिक; तिसऱ्या सामन्यातही विंडीजचा उडवला धुव्वा

हिंदुस्थानच्या महिला संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिज महिला संघाला धूळ चारल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही ‘व्हाईट वॉश’ देताना त्यांचा धुव्वा उडवला आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानने 5 विकेट राखून विजय मिळवत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने खिशात घातली.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हिंदुस्थानच्या रेणुका सिंगने दमदार सुरुवात करत वेस्ट इंडीजचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद केले आणि विंडीजची पहिल्याच षटकात 2 बाद 1 अशी केविलवाणी अवस्था केली. रेणुकाने सलामीवीर क्विना जोसेफ व हेली मॅथ्यूजला शून्यावर बाद करून तंबूत धाडले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या डिएंड्रा डॉटीनलाही रेणुका सिंगने त्रिफळाचीत करत 5 धावांवर माघारी पाठवले. पण त्यानंतर शेमेन कॅम्पबेल व चिनेल हेन्रीने चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडीजचा डाव सावरला. 22 व्या षटकात शेमेन कॅम्पबेलला दीप्ती शर्माने 46 धावांवर बाद केले. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या फलंदाजीची घसरण झाली. दीप्ती शर्माने 31 धावांत 6 विकेट बाद करण्याची किमया साधली तर रेणुका सिंगने 4 विकेट बाद करून वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा कणा मोडला. दीप्ती आणि रेणुकाच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीज 163 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

163 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. स्फोटक फलंदाज स्मृती मानधना अवघ्या 4 धावांवर झेलबाद झाली. प्रतिका रावलने केवळ 18 धावांचे योगदान दिले. मागच्या सामन्यातील शतकवीर हरलीन देओलला एका धावेवर माघारी परतावे लागले. त्यानंतर हरमनप्रीत कौर (32), जेमिमा रॉड्रिग्ज (29), दीप्ती शर्मा (39), रिचा घोष (23) यांनी उपयुक्त खेळय़ा करत हिंदुस्थानी संघाला 29 व्या षटकांत विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि नाबाद 38 धावांची खेळी करणारी दीप्ती शर्मा विजयाची शिल्पकार ठरली तर मालिकेत दहा विकेट टिपणारी रेणुका सिंग मालिकेची मानकरी ठरली.